विजेच्या समस्यांनी नागोठणेवासीय हैराण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नागोठणे : नागोठणे परिसरात काही काळापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचप्रमाणे अवाजवी देयकांमुळे वीजग्राहक हैराण झाले आहेत. या समस्यांवर गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. 

नागोठणे : नागोठणे परिसरात काही काळापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचप्रमाणे अवाजवी देयकांमुळे वीजग्राहक हैराण झाले आहेत. या समस्यांवर गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. 

नागोठणे शहर व परिसरात काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने छोटे-मोठे उद्योगधंदे, दुकानदार, नागरिकांना त्रास होत आहे. अवाजवी देयके येत असल्याने खर्चाचा ताळमेळ बिघडल्याच्या तक्रारी सामान्य वीजग्राहक करत आहेत. 

या समस्यांवर उपाययोजना व्हावी, यासाठी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, माजी सरपंच विलास चौलकर, मनसेचे शहर अध्यक्ष पवन जगताप, साईनाथ धुळे, विश्‍वनाथ शेडगे यांनी महावितरणच्या कार्यालयाला भेट देऊन सहायक अभियंता वैभव गायकवाड यांच्याशी चर्चा केली.गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी असा सणासुदीचा काळ आता सुरू होत आहे. दररोज १० तास वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहर, प्रत्येक गाव, आदिवासीवाडीत सर्वेक्षण करून जीर्ण वीजखांब बदलावेत, अशी मागणी त्यांनी केली.

काही वेळा केबल आणि कंडक्‍टरमध्ये अचानक दोष निर्माण होतात. बाळसई आणि कानसई या वीज उपकेंद्रांत रात्री काम करणे शक्‍य होत नसल्यामुळे दुरुस्तीला अधिक वेळ लागतो. विजेच्या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचे प्रयत्न करीत आहोत.
- वैभव गायकवाड, सहायक अभियंता, महावितरण, नागोठणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue