मुरूडमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तत्त्वतः मान्य करूनही राज्य सरकारने 4 सप्टेंबरला महसूलचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आवश्‍यक ते शासन निर्णय निर्गमित न केल्याने नाईलाजास्तव महसूल राज्य कर्मचारी संघटनेच्या आदेशान्वये मुरूड तालुक्‍यातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुरूड (बातमीदार) ः राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशान्वये आजपासून मुरूड तहसील कार्यालयातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी तहसीलदार परीक्षित पाटील यांना बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन दिले आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तत्त्वतः मान्य करूनही राज्य सरकारने 4 सप्टेंबरला महसूलचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आवश्‍यक ते शासन निर्णय निर्गमित न केल्याने नाईलाजास्तव महसूल राज्य कर्मचारी संघटनेच्या आदेशान्वये मुरूड तालुक्‍यातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारकडे लिपिकाचे पदनाम बदलणे, शिपाई वर्गातून तलाठी वर्गात पदोन्नती देणे, पदोन्नती नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे 4300 वरून 4600 करणे, दांगट समितीच्या अहवालानुसार पदे मंजूर करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अव्वल कारकून या वर्गातील वेतन त्रुटी दूर करणे आदी मागण्या आहेत. आजपासून मुरूड तहसील कार्यालयातील शिपाई, लिपिक, अव्व्ल कारकून, नायब तहसीलदार आदी संवर्गातील सर्व कर्मचारी संपावर गेल्याने तहसील कार्यालयात शुकशुकाट पाहावयास मिळाला. रेशन कार्ड व विविध दाखले घेण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांची निराशा झाली.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue