रोहा परिसरात घुबड संकटात 

घुबड
घुबड

रोहा (बातमीदार) ः घुबडाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते; मात्र काही गूढ कारणांनी रोहा तालुक्‍यातील सुतारवाडी परिसरात दर वर्षी पावसाळ्यात घुबड रस्त्यावर मरून पडलेले आढळतात. त्यामुळे परिसरातील घुबड संकटात असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यातील पूर्वेकडील भाग डोंगरांनी व्यापलेला आहे. परिसरात घनदाट झाडी आहे. याच परिसरात कोलाड-भिरा रस्ता घनदाट झाडी असलेल्या भागात दर पावसाळ्यात पाच ते 10 घुबड मरून पडलेले आढळतात, अशी माहिती या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिली. मागील गुरुवारी (ता. 29) या रस्त्यावर सुतारवाडीजवळ एक घुबड मरून पडलेले आढळून आले. हे हुमा घुबड (ईगल आऊल) जातीचे दुर्मिळ प्रजातीतील घुबड असल्याची माहिती पक्षीतज्ज्ञांनी दिली. पावसाळ्यात या परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर साप येतात. या सापांना पकडण्यासाठी आलेल्या घुबडांना रस्त्यातून जाणाऱ्या वाहनांची धडक लागून त्यांचा मृत्यू होत असावा, अशी शंका धगडवाडीचे रहिवासी कालिदास तवटे यांनी व्यक्त केली.

दर वर्षी पावसाळ्यात पहूर ते विळे या घनदाट झाडी असलेल्या रस्त्यात पाच ते 10 घुबड मरून पडलेले आढळतात, असेही सांगितले; मात्र एवढ्या मोठ्या संख्येने आणि दर वर्षी घुबड मरण्याचे कारण अजून काही वेगळे असण्याची शंका पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

हुमा घुबड-बुबो बेंगलेनसिस असे शास्त्रीय नाव असनेले हे घुबड करड्या रंगाचे चटेरी पटेरी पिसे असलेले असते. दोन्ही पंख पसरलेल्या अवस्थेत एक मीटरपर्यंत मोठे असू शकते. पाय मांजरासारखे व मजबूत असतात. पायाला तीक्ष्ण नख्या असतात. अनेकदा जादूटोण्यासाठी हे घुबड पकडले जातात किंवा यांची शिकार केली जाते. हे पडक्‍या इमारती, दगडखाणी, जुन्या झाडांच्या ढोली व आमराई असलेल्या परिसरात वास्तव्य करून असतात. जगभरात घुबडांच्या दोनशेहून अधिक जाती आढळतात. "ग्रेट ग्रे आऊल' हे जगातील सर्वांत मोठे घुबड मानले जाते. युरोप, आशिया आणि उत्तर आफ्रिकेत ही घुबडे आढळतात. "एल्फ आऊल' हे जगातील सर्वांत लहान घुबड मध्य अमेरिका आणि मेक्‍सिकोमध्ये आढळते. भारतात 36 प्रकारची घुबडे वास्तव्यास आहेत. यातील 50 टक्के घुबड महाराष्ट्रात आढळतात. 

दर वर्षी पावसाळ्यात पहूर ते विळे रस्त्यावर पाच ते 10 घुबड मरून पडलेले आढळतात. रस्त्यावर आलेले साप पकडताना यांचा अपघात होत असावा. 
- कालिदास तवटे, नागरिक, धगडवाडी 

हुमा घुबड हे दुर्मीळ प्रजातीतील आहे. इतक्‍या मोठ्या संख्येने या भागात घुबड मरत असतील तर अपघाताव्यतिरिक्त इतर कारणेही असू शकतात. त्यांचा शोध घ्यायला हवा. 
- तुषार पाटील, पक्षीतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com