अलिबागमध्‍ये प्रवाशांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अलिबाग : गणेश विसर्जनानंतर रविवारी नोकरदार परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, अलिबाग एसटी बसस्थानकात बसेस वेळेवर नसल्याने नोकरदारांची गैरसोय झाली. मुंबई, ठाणे, बोरिवली, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना एसटी स्थानकात तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागले. एसटी आगाराच्या गलथान कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

अलिबाग : गणेश विसर्जनानंतर रविवारी नोकरदार परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, अलिबाग एसटी बसस्थानकात बसेस वेळेवर नसल्याने नोकरदारांची गैरसोय झाली. मुंबई, ठाणे, बोरिवली, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना एसटी स्थानकात तासन्‌तास ताटकळत उभे राहावे लागले. एसटी आगाराच्या गलथान कारभाराबाबत प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

कोकणातील नोकरदार मुंबई, पुणे, बोरिवली, ठाण्यामध्ये नोकरीनिमित्त राहत आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नोकरदार सुट्टी काढून कोकणात येतात. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, म्हसळा, माणगाव, श्रीवर्धन अशा अनेक तालुक्‍यांत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात शनिवारी गौरीसह गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनानंतर रविवारी नोकरदार परतीच्या मार्गावर निघाले. अलिबाग स्थानकात पुरेशा बसेस नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. पनवेलपर्यंत विनाथांबा बसेसही वेळेवर न आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. काहींनी आरक्षण केले होते; परंतु बसेस वेळवर नसल्याने नोकरदारांची गैरसोय झाली. त्यामुळे अलिबाग एसटी स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. 

आगार व्यवस्थापनाची तारांबळ 
एसटी बसेस वेळेवर नसल्याने आगार व्यवस्थापनाची तारांबळ उडाली होती. जादा बसेसची व्यवस्था करण्यास व्यवस्थापन उदासीन ठरले. एसटी बसेस आहेत, तर चालक नाहीत. चालक आहेत, तर वाहक नाही, तसेच चालक व वाहक आहेत, पण गाडीमध्ये बिघाड आहे, अशा अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ प्रवाशांवर आली. प्रवाशांचा संताप अनावर झाला होता. बीट मार्शलचे सहायक पोलिस हवालदार प्रकाश गावंड यांनी मध्यस्थी करून प्रवाशांना शांत केले. 

मुंबईकडे जाण्यासाठी आरक्षण केले होते; परंतु बसेस वेळेवर नसल्याने खूप वेळ स्थानकात उभे राहावे लागले. आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, गेलेल्या गाड्या आल्या नाहीत. त्या आल्यावर बसेस सोडण्यात येतील, असे सांगण्यात आले. 
नितेश शिंदे, प्रवासी 

बाहेरून येणाऱ्या एसटी वेळेवर आल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली; परंतु अलिबाग स्थानकातून बसेस वेळेवर सोडण्यात आल्या असून प्रवाशांना निश्‍चित स्थळी पाठविण्याची व्यवस्था केली होती. 
चेतन देवधर, व्यवस्थापक, अलिबाग आगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue