जिल्ह्यात 17 हजार गणरायांना भावपूर्ण निरोप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

जिल्ह्यातील सार्वजनिक 153 व खासगी 17 हजार 260 असे एकूण 17 हजार 413, गणेशमीर्तींचे तलाव, नदी व समुद्रामध्ये विसर्जन करण्यात आले. या वेळी रायगड पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

अलिबाग : "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या', "चैन पडेना आम्हाला गणपती निघाले गावाला' अशा घोषणा देत जड अंतःकरणाने गणरायाला भक्तांनी निरोप दिला. जिल्ह्यातील सार्वजनिक 153 व खासगी 17 हजार 260 असे एकूण 17 हजार 413, गणेशमीर्तींचे तलाव, नदी व समुद्रामध्ये विसर्जन करण्यात आले. या वेळी रायगड पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.

जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच होती. सायंकाळी ग्रामीण भागात काही वेळ पाऊस कमी झाल्याने गणेशभक्तांनी विसर्जन सोहळा घाईघाईत आटोपून घेतला. काही ठिकाणी रात्री बारापर्यंत; तर काही ठिकाणी पहाटेनंतर गणेशमूर्तींचे विसर्जन केले. खालू बाजा, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पाऊस असल्याने गणेशमूर्ती भिजू नये यासाठी प्लास्टिक कापडाचा आधार देण्यात आला. 
गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 729 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 350 होमगार्ड तैनात करण्यात आले. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अलिबाग नगरपालिकेच्या वतीने समुद्रकिनारी दोन बोटी व 100 स्वयंसेवक; तसेच 30 कर्मचाऱ्यांनी भूमिका बजावली.

दोन बोटींमध्ये गणेशमूर्ती ठेवून खोल समुद्रात स्वयंसेवकांच्या मदतीने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व अलिबाग नगरपालिकेच्या वतीने निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या संस्थांमार्फत करण्यात आले. तसेच पोलिस मदत कक्ष, नियंत्रण कक्षाचीही सोय या वेळी करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue