साखरचौथ गणेशोत्सवासाठी जिल्हावासी सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

या वर्षी साखरचौथीचे सार्वजनिक व खासगी 588 गणरायांचे थाटामाटात आगमन होणार आहे. साखरचौथीच्या गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित व शास्त्रीय आधार मिळत नाही. कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नाही; परंतु वर्षानुवर्षे परंपरागत ही प्रथा चालत आली आहे. या प्रथेकरता गणेशा गणनायक असल्याने त्याच्या स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.

महाड ः अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता रायगडकरांना वेध लागले आहेत ते साखरचौथ गणेशाचे. भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साखरचौथ गणेशाचे आगमन होत असल्याने रायगडात पुन्हा गणेशोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे.

या वर्षी 17 सप्टेंबरला येत असलेल्या संकष्टी चतुर्थीला रायगड जिल्ह्यात साखरचौथीच्या 264 सार्वजनिक व 324 खासगी अशा 588 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन झाले आहे. आता साखरचौथ गणेशोत्सवाची चाहूल लागू लागल्याने पुन्हा नव्याने उत्साहाचे वातावरण अनुभवयास मिळणार आहे. साखरचौथीच्या या गणेशाची स्थापना जिल्ह्यातील पनवेल, पेण व अलिबाग या तालुक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जात असते; परंतु आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात हे वातावरण निर्माण होऊ आहे.

या वर्षी साखरचौथीचे सार्वजनिक व खासगी 588 गणरायांचे थाटामाटात आगमन होणार आहे. साखरचौथीच्या गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित व शास्त्रीय आधार मिळत नाही. कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नाही; परंतु वर्षानुवर्षे परंपरागत ही प्रथा चालत आली आहे. या प्रथेकरता गणेशा गणनायक असल्याने त्याच्या स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही.

महाडमधील माजी आमदार माणिक जगताप संस्थापक असलेल्या लोकविकास सामाजिक संस्थेकडूनही गेले तीन-चार वर्ष साखरचौथ गणेशोत्सव सुरू केलेला आहे. पेण, कुरूळ, कुरूळ नाका, श्रीबाग, रोहा, सानेगाव, श्रीवर्धन, दांडा, पाच रस्ता, नांदगाव, पळस, अष्टमी, रेवदंडा या भागांमध्ये दर वर्षीप्रमाणे साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पूर्वी हे गणपती दीड दिवसाचे; परंतु गेल्या काही वर्षांपासून काही ठिकाणी या गणपतीची स्थापना अडीच व पाच दिवस करण्यात येत आहे. गणपती उत्सवामुळे रायगड जिल्ह्यात आता पुन्हा गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. 

साखरचौथ कशासाठी? 
साखरचौथीच्या गणपतीची स्थापना मुख्यत्वे गणपती कारखानदार व कामगार पूर्वी करत असत. भाद्रपदाच्या गणपती विक्रीसाठी पेणच्या बाहेर मुक्कामाला जावे लागत असल्याने अनेक कारखानदार व नोकरदारांना आपल्या घरातील तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात भाग घेता येत नव्हता. त्यामुळे साखरचौथीच्या गणपतीची संकल्पना रायगडमध्ये अस्तित्वात आली असावी, असे मानले जाते. साखरचौथीच्या गणेशोत्सवात गेल्या काही वर्षांत मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. असा हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपाचे साजरा होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue