कर्जतकरांना समस्या डोईजड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पालिका प्रशासनाकडून टोईंग व्हॅन सुरू करण्यात आली; मात्र वाहनचालक आणि व्हॅनवरील कर्मचारी यांच्यात गाडी उचलण्यावरून शाब्दीक चकमकी वाढल्या. नागरिकांसाठी प्रथम पुरेशी पार्किंगची सोय उपलब्ध करा मगच कारवाई करा, असा नाराजीचा सूरही वाहनधारकांतून उमटत आहे. कर्जत शहरात अवैध बांधकामेही होत आहेत.

कर्जतः मुंबई-पुणे मध्य रेल्वे मार्गाच्या मध्यावरील कर्जत रेल्वेस्थानक. या दळणवळणाच्या सोईसुविधांमुळेच तसेच ग्रीन झोनमुळे कर्जतला निवासासाठी नागरिकांची अधिक पसंती. त्यामुळे साहजिकच अवघ्या काही वर्षांतच मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभारली गेली आणि यामुळे शहरीकरण, नागरीकरण वाढले; मात्र त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात कर्जत पालिकेला अपेक्षित यश आले नसल्याने तेच प्रश्‍न त्याच समस्या; सुटणार तरी कधी, असा आर्त सवाल कर्जतकरांमधून विचारला जात आहे.

पालिका प्रशासनाकडून टोईंग व्हॅन सुरू करण्यात आली; मात्र वाहनचालक आणि व्हॅनवरील कर्मचारी यांच्यात गाडी उचलण्यावरून शाब्दीक चकमकी वाढल्या. नागरिकांसाठी प्रथम पुरेशी पार्किंगची सोय उपलब्ध करा मगच कारवाई करा, असा नाराजीचा सूरही वाहनधारकांतून उमटत आहे. कर्जत शहरात अवैध बांधकामेही होत आहेत.

शहरातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केले; मात्र त्यावेळेस रस्त्यामधील विजेचे खांब तेथून हटविले नाही. यामुळे हे विजेचे खांब आजही रस्त्याच्या मधोमध मृत्यूदूत म्हणून उभे आहेत. शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा याबाबतही काही प्रभागातील नागरिकांची ओरड आहे. काही प्रभागात मुबलक पाणी तर काही भागात अतिशय कमी दाबाने पाणी अशी परिस्थिती आहे. पेज नदीवरून कर्जतला पाणी जलवाहिनीद्वारे आणले जाते; मात्र जलवाहिनी जुनी, जीर्ण झाल्याने वारंवार फुटून गळती होत आहे. वंजारवाडी येथे पाणी उपसण्यासाठी पंप बसविण्यात आला आहे; मात्र तेथील वीजपुरवठा अनेकदा खंडित होत असल्याने कर्जत शहराचा पाणीपुरवठाही खंडित होत आहे.

सर्वांत नेहमीच चर्चिला जाणारा मुख्य प्रश्‍न वाहतूक कोंडी आणि पार्किंगची सुविधा. तत्कालीन नगराध्यक्ष शरद लाड असताना कर्जत शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी खर्चून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते बनविले. फेरीवाल्यांना हटविण्यात आले. त्यामुळे पादचाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला; परंतु त्यांचे हे समाधान फारच अल्प काळ टिकले. या रस्त्यांवर पुन्हा भाजीवाले, फेरीवाले यांनी ठाण मांडले. परिणामी रस्ते अरुंद झाले. त्यातच शहरात पुरेशी पार्किंग सोय नसल्याने वाहनधारक कसेही, कुठेही वाहने पार्क करीत आहेत. त्यामुळे रस्ता अडवला जाऊन वाहतूक कोंडीची समस्या वारंवार डोके वर काढीत आहे. एवढी वर्षे उलटून सत्ताबदल होऊन आजही समस्या जैसे थे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue