खोपोलीतील वाट बिकट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

खोपोली, ता. १५ (बातमीदार) : गेल्‍या महिन्‍यांत गणपती आगमनापूर्वी खोपोली शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पूर्ण बुजविण्याचे नगरपालिकेचे आश्‍वासन हवेत विरले आहे. शहरातील रेल्वेस्थानक परिसर, लक्ष्मीनगर, बाजारपेठ, शास्त्रीनगर, वीणानगर - काटरंग - पाटणकर चौक, वासरंग लौजी, मोगलवाडी, लौजी - चिंचवली, ताकई येथे सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकविताना नागरिकांसह वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, यासाठी सर्वच नगरसेवक आक्रमक आहेत. डांबरीकरण झालेल्या सर्वच रस्त्यांवर एकाच वर्षात मोठमोठे खड्डे पडले आहेत. यावर्षी गणपती आगमनापूर्वी सर्वच रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील असे आश्‍वासन नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. या कामासाठी ठेकेदाराची नेमणूकही झाली. मात्र, शहरातील अंतर्गत रस्‍त्‍यावर अजूनही खड्डे व चिखलातून मार्ग काढत विद्यार्थी, महिला आणि नागरिकांची तारांबळ होत आहे. 

श्रीमंत नगरपालिका फक्त कागदावर आहे. ती श्रीमंती विकासकामात कधी दिसत नाही. विविध समस्यांनी सर्वसामान्य नागरिक हैराण असून, ‘कुठे नेऊन ठेवली खोपोली’ असे बोलण्याची वेळ आल्याचे खोपोलीतील रहिवासी प्रवीण क्षीरसागर यांनी सांगितले. 

प्रशासन व सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा विरोधी पक्षच नगरपालिकेत अस्तित्वात नाही. सत्ताधारी व विरोधक सोयीचे राजकारण व भूमिका वठवित असल्याने ही दयनीय अवस्था आहे. दुसरीकडे नागरिक सर्व सहन करीत असून, कोणीही जाब विचारत नसल्याने प्रशासन व सत्ताधारी सर्व काही आलबेल असल्यासारखे वागत आहेत.
- रिचर्ड जॉन, शहर अध्यक्ष, काँग्रेस

गणपती विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. इतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे या कामात अडचणी येत आहेत. तसेच प्रमुख सर्व रस्त्यांचे संपूर्ण डांबरीकरण व काही रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची कामे मंजूर असून ती प्रस्तावित असल्याने दुहेरी खर्च टाळण्यासाठी येथील कामे सध्या स्थगित ठेवली आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होईल.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue