तलाठी सजांत खासगी मदतनीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

सुधागड तालुक्‍यात एकूण शंभर महसुली गावे आहेत. त्यामध्ये १५ तलाठी सजा आहेत. तीन मंडळे आहेत. यापैकी बहुतांश तलाठ्यांकडे सरकारी कोतवाला व्यतिरिक्त खासगी मदतनीस आहेत. यामुळे येथील कोतवाल यांच्यावरही अन्याय होत आहे. तलाठी कार्यालयात सरकारचे अतिमहत्त्वाचे कागदपत्रे असतात.

पाली : सुधागड तालुक्‍यातील तलाठी कार्यालयांत बेकायदेशीररीत्या खासगी मदतनीस ठेवण्यात आले आहेत. यामुळे सरकारी कागदपत्रे व दस्ताऐवज धोक्‍यात आले आहेत. या खासगी मदतनीसांद्वारे सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत; मात्र पैसेवाले गेले असता त्यांचे काम तत्काळ होते, असा अनेकांचा अनुभव आहे. सरकारी कामांत खासगी व्यक्तींची ढवळाढवळ होत आहे, असा आरोप येथील स्थानिक व कोतवाल करीत आहेत. अशा प्रकारे बेकायदा व नियमबाह्य मदतनीस ठेवले असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिले आहेत.

सुधागड तालुक्‍यात एकूण शंभर महसुली गावे आहेत. त्यामध्ये १५ तलाठी सजा आहेत. तीन मंडळे आहेत. यापैकी बहुतांश तलाठ्यांकडे सरकारी कोतवाला व्यतिरिक्त खासगी मदतनीस आहेत. यामुळे येथील कोतवाल यांच्यावरही अन्याय होत आहे. तलाठी कार्यालयात सरकारचे अतिमहत्त्वाचे कागदपत्रे असतात. या कागदपत्रांना शासकीय व्यक्तींव्यतिरिक्त कोणीही हाताळू शकत नाही. तसेच ७/१२, फेरफार, वारस नोंद, सर्व प्रकारचे दाखले या व अशा प्रकारची कामे तलाठी व कोतवाल यांनी मिळून करायची असतात; मात्र या कामांमध्ये कोतवालांना सोबत न घेता परस्पर खासगी मदतनीसामार्फत करून घेतले जात आहेत.

तलाठ्यांचे अतिमहत्त्वाचे DSC (संगणीकृत स्वाक्षरी) हीदेखील खासगी मदतनीस सर्रास वापरत आहेत. यामुळे अनेक अफरातफरींना चालना मिळत आहे. तालुक्‍यातील कोतवाल मात्र वसुली, गौणखनिज, पंचनामे व अतिवृष्टी यासारखी कामे देऊन राबवले जाते. तलाठी यांनी नेमलेले खासगी मदतनीस हे शासकीय कागदपत्र हाताळतांना दिसत आहेत. त्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कोतवाल संघटना आक्रमक
या खासगी मदतनीसांना त्वरित कमी करावे; जेणेकरून शासकीय कामात खासगी व्यक्तीची ढवळाढवळ होणार नाही. याकरिता कोतवाल संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी याबाबत पाली तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले आहे. यापूर्वीही कोतवाल संघटनेने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले होते; मात्र आजतागायत कुठल्याही प्रकारची कारवाई खासगी मदतनीस यांच्यावर झाली नसल्याने संतप्त कोतवाल हे आंदोलन करणार आहेत. 

खासगी मदतनीस हे पूर्णतः बेकायदेशीर काम करीत आहेत. त्यांना कोणताही शासकीय दस्तावेज हाताळण्याचा अधिकार नाही. तसे होताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
- दिलीप रायन्नवार, तहसीलदार, पाली-सुधागड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue