येरळ गावाने करून दाखवलं! 

संग्रहित
संग्रहित

कोलाड : लग्नसमारंभ, वाढदिवस व धबधब्यांवरील पार्ट्यांकडे तरुणांचा ओढा वाढला असून, अनेक तरुण दारू आणि सिगरेटच्या आहारी गेल्याचे आढळते. ही स्थिती बदलण्याचा निर्धार करून रोहा तालुक्‍यातील येरळ येथील ग्रामस्थांनी संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हळदी समारंभात दारू आणि मांसाहाराची प्रथा बंद करण्याचे एकमताने ठरवून या गावाने आदर्श निर्माण केला आहे. 

येरळ या निसर्गरम्य गावात गणपती विराजमान झाल्यानंतर ग्रामस्थ एकत्र जमले. या सभेला तरुण, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. नोकरीनिमित्त मुंबईला गेलेले तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही आवर्जून आले होते. गजानन कदम, संजय आयरे, चंद्रकांत शिंदे, सदाशिव जाधव आणि आता हयात नसलेले मधुकर जाधव, सीताराम शिंदे, मारुती मोरे, सहदेव शिंदे आदी कार्यकर्त्यांनी चार दशकांपूर्वी स्थापन केलेल्या आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात आघाडीवर असलेल्या संस्थेने ही सभा बोलावली होती. गावात यापुढे दारूचे नामोनिशाणही दिसणार नाही, असा निर्णय सर्वांनी एकमताने घेतला. 

ग्रामस्थ मंडळाच्या अध्यक्षपदी विजय धनाजी आयरे यांची 26 जानेवारीला निवड झाली. त्यानंतर त्यांनी दारूबंदी आणि लग्न-हळदीच्या दिवशी दारू-मांसाहारबंदी करण्यासाठी पुढाकार घेतला. 18 ऑगस्टला झालेल्या ग्रामसभेत प्रवीण जाधव यांनी लग्न-हळदीच्या कार्यात दारू-बकऱ्या-कोंबड्यांच्या पार्ट्या बंद झाल्या पाहिजेत, असे ठामपणे सांगितले होते. त्याला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला होता. त्यानुसार 5 सप्टेंबरला झालेल्या ग्रामसभेने धार्मिक-सामाजिक कार्यातून दारू नावाच्या विषाला हद्दपार केले. 

या निर्णयात मंडळाचे कार्याध्यक्ष जगन्नाथ कोंडे, सहसचिव चंद्रकांत गुजर, उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह रमेश पवार, मंगेश मोरे, प्रवीण मोरे, प्रवीण जाधव, श्‍याम शिंदे आदी कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यात मंडळाचे माजी अध्यक्ष मारुती मोरे, शशिकांत मोरे, ग्रामसमितीचे अध्यक्ष विजय साळुंखे, पोलिस पाटील सुनील शिंदे आदींनी मोलाचे सहकार्य केले. 

तरुणाईचा पुढाकार 
लग्नासारख्या शुभकार्यात श्रीमंत मंडळी लाखो रुपये उधळतात; त्यामुळे गोरगरिबांना लाजेखातर कर्ज काढून खर्च करावा लागतो. दारू आणि मटणावर होत असलेला अनाठाई खर्च व अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी अनेक तरुणांनी पुढाकार घेतला. गावात पूर्ण दारूबंदी व हळदी समारंभात दारू-मटणाची प्रथा हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शिवीगाळ, हाणामारी, वैमनस्याला खतपाणी घालणारी ही प्रथा आता कायमची बंद होईल, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com