कॉंग्रेसकडून राजाभाऊ ठाकूर रिंगणात? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मुरुड : आगामी अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे युवा नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी मुरुड तालुका कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. ठाकूर यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही हिरवा कंदील दिल्याने शेकापच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

मुरुड : आगामी अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे युवा नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी मुरुड तालुका कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. ठाकूर यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही हिरवा कंदील दिल्याने शेकापच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

तालुका बैठकीला मुरुड तालुका कॉंग्रेस आयचे अध्यक्ष सुभाष महाडिक, तालुका उपाध्यक्ष सुदेश वाणी, मुरुड शहर अध्यक्ष श्रीकांत गुरव, कॉंग्रेसचे नगरसेवक प्रा. विश्‍वास चव्हाण, आरती गुरव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, उपसभापती प्रणिता पाटील, मुअज्जम हसवारे, कृष्णा अंबाजी, लहू रावजी, अमित नाईक, उपसरपंच प्रीतम पाटील, अजगर दळवी, वासंती उमरोटकर यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. 

या बैठकीत राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितले, की माझ्या उमेदवारीबद्दल अलिबाग-मुरुड विधानसभा क्षेत्रात अफवा पसरवल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नसल्याचा पुनर्उच्चार त्यांनी केला. कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ही जागा लढविण्याचा हिरवा कंदील दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या वेळी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी राजाभाऊ यांना पाठिंबा दर्शवत टाळ्यांचा कडकडाट केला.

रस्त्याची कामे सुप्रभात कंपनी अर्थात विद्यमान आमदार पंडित पाटील यांनी घेतली असून निकृष्ट रस्त्यांच्या कामांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुरुड-अलिबाग रस्त्यासाठी लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या वेळी मुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक यांनी सांगितले, की विधानसभा निवडणुकीत आघाडी असो वा नसो, कॉंग्रेसचे उमेदवार राजाभाऊ ठाकूर हे असतील. तालुका कॉंग्रेसची संपूर्ण ताकद राजाभाऊ ठाकूरांना देणार असून इतर सहयोगी पक्षांची मतेसुद्धा मिळवण्याचा निश्‍चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले; तर रायगड जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue