आधी हाताला चटके मग मिळते भाकर...! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

चूल तयार करणे (आकार, उंची, प्रकाश), चूल पेटवणे, (ज्वलनासाठी आवश्‍यक घटक), तवा व्यवस्थापन (उष्णता), पीठ मळणे (स्वच्छता, पाण्याचे प्रमाण), भाकरी तयार करणे (भौमितीक आकार), भाकरी भाजणे (शेकोटीच्या गोष्टी) अशाप्रकारे पूर्ण माहिती घेत विद्यार्थ्यांनी स्वत: चुली पेटवल्या.

पोलादपूरः साहित्याची जमवा-जमव... चूल पेटवण्यासाठी लागणारा लाकूडफाटा... भांड्यांचा आवाज आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींचा किलबिलाट... हे चित्र होते गोळेगणी शाळेतील! एखाद्या स्वयंपाकगृहात जशी सार्वजनिक कार्यक्रमावेळी महिलांची धावपळ असते, तसे आज शाळाचे जणू स्वयंपाकगृह बनले होते. निमित्त होते शाळेतर्फे आयोजित स्वयंपाकगृह व्यवस्थापन उपक्रमाचे! दीड-दोन तासांची ही धावपळ अखेर विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमातून बनलेल्या स्वादिष्ट भोजनानंतर थांबली अन्‌ "आधी हाताला चटके; मग मिळते भाकर' याची प्रचीती विद्यार्थ्यांना आली. 
तालुक्‍यातील गोळेगणी शाळेत सहशालेय उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. 18) विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकगृह व्यवस्थापन उपक्रम राबवण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी चुलीवर जेवण बनविण्याचा अनुभव व निसर्गरम्य परिसरात भोजनाचा अनुभव घेतला.

तालुक्‍यातील गोळेगणी शाळा नेहमीच विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम घेत असते. पिझ्झा-बर्गरकडे वळलेल्या मुलांना चुलीवरच्या जेवणाची चव व आईच्या कष्टाची भाकरी कशी बनते हे समजावण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष जेवण कसे बनवायचे, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. चूल तयार करणे (आकार, उंची, प्रकाश), चूल पेटवणे, (ज्वलनासाठी आवश्‍यक घटक), तवा व्यवस्थापन (उष्णता), पीठ मळणे (स्वच्छता, पाण्याचे प्रमाण), भाकरी तयार करणे (भौमितीक आकार), भाकरी भाजणे (शेकोटीच्या गोष्टी) अशाप्रकारे पूर्ण माहिती घेत विद्यार्थ्यांनी स्वत: चुली पेटवल्या. मुलांनी भाकरी तयार केली तिला भाजली; मात्र या वेळी आईच्या घरातील कामाचे मोल मुलांना लक्षात आले. "आधी हाताला चटके; मग मिळते भाकर' याची प्रचीती विद्यार्थ्यांना झाली. 

या वेळी स्वतः बनविलेल्या जेवणाचा विद्यार्थ्यांनी एकत्र आस्वाद घेतला. त्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती सुरू झाली. सर्व विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या झाडांची माहिती, परसबागेत फेरफटका, विविध रंगांच्या फुलांची व विविध पानांची माहिती, रंगबेरंगी फुलपाखरे, गुरांच्या गोठ्याला भेट, विविध पक्षी निरीक्षणे, इंद्रधनुष्य, वृक्षारोपणात लावलेल्या झाडांची देखभाल व काळजी या वेळी घेतली. त्यानंतर एक तास नदी परिसरात घालवत विद्यार्थ्यांनी सभोवतालच्या वातावरणातील अनेक घटकांचे निरीक्षण व माहिती घेतली. या वेळी व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्‍वर मोरे, केंद्रप्रमुख विजय जाधव, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे, विलास उतेकर, सचिन दरेकर, नीलेश गोसावी, शंकर बळीकोंडवार आदी उपस्थित होते. 

सध्याची मुले निसर्गापासून दूर होत आहेत. पहिल्यासारखे चुलीवरचे जेवण व ती चव दुर्मिळ होत चालली आहे. पिझ्झा-बर्गरच्या या युगात आईने मोठ्या प्रेमाने, कष्टाने बनवलेली भाकरीची गोडी वाटावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंनिर्मितीची व कष्टाची जाणीव, आवड निर्माण व्हावी, प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला. 
- सचिन दरेकर, शिक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue