जिल्ह्यातील पशुधन सलाईनवर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये विविध प्रकारची अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागामध्ये काम करत असलेल्या इतर अधिकारी वर्गावर कामाचा ताण पडत असतो. पदे रिक्त असल्यामुळे इतर दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. 

महाडः प्राण्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांनाही चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून पशुवैद्यकीय दवाखाने उघडण्यात आले; परंतु या दवाखान्यांमध्ये सध्या रिक्त पदांमुळे पशुआरोग्य सेवेलाही अडचणी निर्माण होत आहेत. भरती होत नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची काळजी घेणारे हक्काचे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन सलाईनवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सरकारकडून आता गोवंश वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागामध्ये स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली. पर्यायाने याचा परिणाम पशुधन संख्या घटण्यावरही झाला. महाड तालुक्‍यात ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे, सुरत येथे नोकरी-व्यवसायासाठी स्थलांतरित आहे. त्यामुळे गावामध्ये आता केवळ शेती व शेतजोड व्यवसाय करणारे राहिले आहेत. तालुक्‍यात सद्यस्थितीत सुमारे 23 हजार पशुधन आहे. अशा स्थितीमध्ये गावांमध्ये असलेले पशुधन जगविण्यासाठी ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. त्यातच पशुधनासाठी आवश्‍यक आरोग्य सेवा ही कर्मचाऱ्यांमुळे कोलमडली आहे. 

राज्य सरकारचे पशुवैद्यकीय दवाखानेही पदांअभावी आरोग्यसेवा देण्यास सक्षम ठरत नाहीत. महाड तालुक्‍यातील तेलंगे, दासगाव, वाळसुरे, चांढवे खुर्द व पोलादपूर येथील लोहारमाळ या पाच ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. वाळसुरे व वरंध या दवाखान्यांमध्ये शिपायांची दोन पदेही रिक्त आहेत. एका बाजूला ग्रामीण भागांमध्ये पशुधन आरोग्याची समस्या निर्माण होत असतानाच ग्रामीण भागातील शेतकरी शहरातील दवाखान्याकडे अनेकदा येत असतो. तालुक्‍याच्या ठिकाणी सरकारने लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय निर्माण केली आहेत. महाड येथील नवेनगर भागांमध्ये असे चिकित्सालय आहे; परंतु या चिकित्सालयामध्येही पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त हे पद रिक्त आहे. एक लिपिकाचेही पद रिक्त आहे. 

महाड तालुक्‍याकडे दुर्लक्ष 
महाडमध्ये राज्य सरकारचे नऊ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. जिल्हा परिषदेचेही नऊ स्वतंत्र पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. जिल्हा परिषदेच्या मांघरुण येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एक येथे पशुधन विकास अधिकारी नाही, तर विन्हेरे, रावढळ, कोंझर या तीन ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक यांची कमतरता आहे. याशिवाय महाड पंचायत समितीमध्येही पशुधन पर्यवेक्षक (विस्तार) हे पदही अनेक वर्षांपासून रिक्त आहे. याशिवाय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये काम करण्यासाठी शिपायांची गरज लागत असते. असे शिपाईही बेबलघर, निजामपूर व मांघरुण या दवाखान्यामध्ये भरलेले नाहीत. 

अतिरिक्त कामाचा ताण 
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये विविध प्रकारची अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागामध्ये काम करत असलेल्या इतर अधिकारी वर्गावर कामाचा ताण पडत असतो. पदे रिक्त असल्यामुळे इतर दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिक्त पदाचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. 

ग्रामीण भागामध्ये शेती व दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल, पशुधन वाढवायचे असतील तर सरकारने ही पदे त्वरित भरली पाहिजेत. 
- अनंत पवार, शेतकरी 

पशू विभागातील रिक्त पदांबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जात असतो. 
- डी. एस. सोनावेल, पशुधन विकास अधिकारी, महाड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue