"जन विकास'मधून श्रीवर्धन, म्हसळ्याला वगळले-सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्‍यामध्ये 25 टक्केपेक्षा अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे हे दोन तालुके अल्पसंख्याक केंद्रीत करण्याबाबत केंद्रीय मंत्री नाक्वी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय झाला असून, याला हिरवा कंदील मिळणार आहे. 
- सुनील तटकरे, खासदार 

अलिबागः अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे; मात्र या कार्यक्रमातून जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा हे दोन अल्पसंख्याक तालुके वगळण्यात आले आहेत. यावर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी पाठपुरावा करीत या दोन्ही तालुक्‍यांचा समावेश करावा, अशी मागणी अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नाक्वी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

 
श्रीवर्धन व म्हसळा या तालुक्‍यांत अनुक्रमे 26.06 व 30.09 टक्के अल्पसंख्याक वस्ती आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. यामुळे तालुक्‍याच्या एकंदरीत विकासालाही गती प्राप्त होईल. त्यासाठी या दोन तालुक्‍यांचा प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक केंद्रीत तालुका म्हणून समावेश व्हावा, अशी मागणी तटकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली. त्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नाक्वी यांनी अनुकूलता दर्शवत लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्‍यांना अल्पसंख्याक तालुक्‍याचा दर्जा मिळणार असून, तेथील विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

श्रीवर्धन व म्हसळा तालुक्‍यामध्ये 25 टक्केपेक्षा अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे हे दोन तालुके अल्पसंख्याक केंद्रीत करण्याबाबत केंद्रीय मंत्री नाक्वी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय झाला असून, याला हिरवा कंदील मिळणार आहे. 
- सुनील तटकरे, खासदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue