नाना-नानी पार्क रखडले

प्रस्तावित नाना-नानी पार्कमध्‍ये मातीचे ढीग साचले आहेत.
प्रस्तावित नाना-नानी पार्कमध्‍ये मातीचे ढीग साचले आहेत.

खोपोली : खोपोली शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र एक वर्षाहून अधिक काळ उलटला तरीही खोपोली पालिकेकडून कोणतीही हालचाल झाली नाही. आता या जागेचे रूपांतर कचराभूमीमध्ये झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खोपोलीमधील ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

गेल्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार, पावसाळी हंगामात नगरसेविका जिनी सॅम्युअल यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई-पुणे महामार्गालगत शास्रीनगर भागात नगरपालिकेच्या माध्यमातून नाना-नानी पार्कचे भूमिपूजन व येथील मोकळ्या जागेत रोपलागवड करण्यात आली होती. या वेळी पुढील सहा महिन्यांत या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती होईल, असे आश्वासन नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते.

एक वर्षापूर्वी खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, तत्कालीन आरोग्य सभापती अपर्णा मोरे, परिवहन सभापती सुनीता गायकवाड, नगरसेवक बेबीशेठ सॅम्युअल, नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, नगरसेविका प्रमिला सर्वे यांच्या उपस्थितीत या नाना-नानी पार्कचे भूमिपूजन झाले होते.

नाना-नानी पार्क उपक्रमातील काही जागा महामार्ग रुंदीकरणात जाते. तरीही उर्वरित जागेचा उपयोग याकामी होऊ शकतो का? याबाबत शहर अभियंत्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. हा विषय मागील काळातील असल्याने या संबंधी अधिक माहिती घ्यावी लागेल.
- गणेश शेटे, मुख्याधिकारी, खोपोली

आवश्‍यक जागेअभावी नाना-नानी पार्क उपक्रम रखडला आहे. याबाबत पर्यायी जागा किंवा अस्तित्वात असलेल्या जागेत कशा प्रकारे विकास करता येईल, यासाठी नगरपालिका बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली पालिका

नाना-नानी पार्कबाबत सतत पाठपुरावा करूनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या जागेतील काही जागा महामार्गासाठी जात असली, तरी उर्वरित जागेत नाना-नानी पार्क निर्माण होऊ शकते. तसे होत नसेल तर यासाठी प्रभागातील अन्य जागा उपलब्ध करून मिळण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या जागेचा विकास करून नाना-नानी पार्कच्या निर्मितीबाबत नव्याने पाठपुरावा सुरू आहे.
- जिनी सॅम्युयल, स्थानिक नगरसेविका
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com