पाच तासांनंतर गिर्यारोहक दरीतून बाहेर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला आहे. त्याला विकटगड असेही नाव आहे. या किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. किल्ल्यावर जाण्याच्या मुख्य दोन वाटा आहेत. एक माथेरान रेल्वे रुळा मार्गे जी सोपी आणि सुरक्षित आहे व दुसरी नेरळ आनंदवाडी येथील जंगलातील वाट. ही वाट घनदाट जंगलातून जात असल्याने अवघड व किल्ल्याच्या नावाप्रमाणे ही वाट विकट आहे.

नेरळः नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. 21) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो 500 फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील सह्याद्री रेस्क्‍यू टीमने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत माथेरानजवळ शिवकालीन पेब किल्ला आहे. त्याला विकटगड असेही नाव आहे. या किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. किल्ल्यावर जाण्याच्या मुख्य दोन वाटा आहेत. एक माथेरान रेल्वे रुळा मार्गे जी सोपी आणि सुरक्षित आहे व दुसरी नेरळ आनंदवाडी येथील जंगलातील वाट. ही वाट घनदाट जंगलातून जात असल्याने अवघड व किल्ल्याच्या नावाप्रमाणे ही वाट विकट आहे. शनिवारी पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी नवी मुंबई व कल्याण येथून सहा जणांचा एक ग्रुप नेरळ येथे आला होता. सकाळी त्यांनी नेरळ आनंदवाडी येथून मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्थानिक आदिवासी यांनी त्यांना वाटाड्या सोबत घेऊन जा, असा सल्ला दिला; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत सदर ग्रुप किल्ल्याच्या दिशेने पुढे गेला. यात तीन महिलांचाही समावेश होता.

किल्ल्याच्या जवळपास पोहचताच दुपारी 1 च्या सुमारास त्यातील कल्याण येथील रमेश कुमार रामनाथन यांचा पाय घसरून ते 500 फूट दरीत कोसळले. रामनाथन याना हाक मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा खालच्या बाजूने त्यांना रामनाथन यांच्या ओरडण्याचा आवाज आला. प्रसंगावधान राखत ग्रुपमधील लोकांनी नेरळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पडलेली व्यक्ती जिवंत असल्याचे समजताच नेरळ पोलिसांनी माथेरानच्या सह्याद्री रेस्क्‍यू टीमला पाचारण केले. या दोन्ही टीमनी पेब किल्ला गाठला. रामनाथन यांचा फोन सुरू असल्याने त्यांनी आपले लोकेशन पाठवले होते. त्यामुळे त्यांना शोधणे रेस्क्‍यू टीमला सोपे झाले. रेक्‍यू टीमने रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास रामनाथन यांना सुखरूप नेरळ येथे आणले. त्या वेळी नेरळ आनंदवाडी येथे 108 रुग्णवाहिका व बॅकअपसाठी नेरळ शिवसेनेचे शाखाप्रमुख रोहिदास मोरे त्यांची रुग्णवाहिका घेऊन थांबले होते.

रामनाथन यांना खाली सुखरूप आणल्यावर ते रक्ताने माखले होते. शरीरावर जखमा होत्या. त्यामुळे त्यांना स्थानिक डॉक्‍टरांना दाखवून पुढे नेण्याची विनंती मोरे यांनी केली. तेव्हा नेरळ धन्वंतरी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून 108 रुग्णवाहिकेत त्यांना पुढे फॉरटीस रुग्णालयात रवाना करण्यात आले. सुमारे पाच तासांच्या वर हे रेस्क्‍यू ऑपरेशन चालले. यामध्ये नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई घनश्‍याम पालवे, बंडू सुळ, रमेश बोडके व होमगार्ड उगले, सह्याद्री रेस्क्‍यू टीमचे सुनील कोळी, संदीप कोळी, उमेश मोरे, संतोष केळगणे आदी सामील झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue