महाडमध्‍ये ‘वंचित’चाही उमेदवार मैदानात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

महाड : लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून महाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे नाव वंचितकडून पुढे येत असल्याने विधानसभा निवडणुकीला चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत.

महाड : लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून महाड विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे नाव वंचितकडून पुढे येत असल्याने विधानसभा निवडणुकीला चांगलीच रंगत येण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने एक वेगळाच दबदबा निर्माण केला. या आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी अल्पावधीतच अन्य राजकीय पक्षांना धडकी भरवली; मात्र लोकसभा निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र याचा विचार न करता वंचितने तत्काळ विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली. 

कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघ हा विशेष महत्त्व असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात गेली अनेक वर्षे शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अशी थेट लढत राहिली आहे. या वेळीदेखील तीच स्थिती पहावयास मिळणार आहे. ही लढत दुरंगी होत असली तरी आता वंचित बहुजन आघाडीकडून देखील महाड विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. याकरिता सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचे नाव पुढे आले आहे. जंगले यांनी महाडसह रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम केले आहे. ग्रामीण भागातील विशेषतः दुर्गम धनगरवाड्यांवर त्यांचा दांडगा संपर्क आहे. या समाजासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. जंगले यांनी लोकसभा निवडणुकीसाठी देखील रायगडमधून अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांनी नंतर माघार घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue