विद्यार्थ्यांनी अनुभवला "शाळकरी पर्यटका'चा "फिल'! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

महाड व पोलादपूर, बिरवाडी येथील 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. आजची पिढी मोबाईल, टीव्हीच्या मोहोजाळात ओढली गेली आहे. अशा स्थितीत बालमनाला एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात टवटवीतपणा आणण्यासाठी ऐतिहासिक भूमीत निसर्गसंपदेच्या कुशीत मुलांनी रमावे, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले.

पोलादपूरः रोजचा अभ्यासाचा ताण, शिकवणी वर्ग यापासून विरंगुळ्यासाठी येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेने खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या "महाभटकंती' उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांचा जवळून अभ्यास करता आला. या एकदिवसीय उपक्रमातून विद्यार्थ्यांनी "शाळकरी पर्यटका'चा "फिल' अनुभवला.
 
महाड व पोलादपूर, बिरवाडी येथील 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. आजची पिढी मोबाईल, टीव्हीच्या मोहोजाळात ओढली गेली आहे. अशा स्थितीत बालमनाला एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात टवटवीतपणा आणण्यासाठी ऐतिहासिक भूमीत निसर्गसंपदेच्या कुशीत मुलांनी रमावे, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. नरवीर त्याग भूमी समाधीस्थळ व नरवीर स्मारक-उमरठ, शक्ती स्थळ साखर-शूरवीर सूर्याजी मालुसरे समाधीस्थळ, त्रिवेणी चौक बोरज फाटा येथील सांप्रदायिक मठ व संभाव्य गोशाळा, शेलार मामा समाधीस्थळ, ऐतिहासिक काळातील शस्त्रास्त्र ठेवा सापडलेला नरवीर शौर्याचा साक्षीदार महाकाय वृक्ष, साईट सीन-निसर्ग ठिकाणे, निसर्गरम्य मोरझोत धबधबा, झुलता पूल व सावित्री नदी येथे पर्यटन दर्शन करत त्यांना त्यांची माहिती समजावून सांगण्यात आली. विद्यार्थ्यांनीही ती कुतूहलाने जाणून घेतली.

या वेळी विविध खेळही खेळले. दुपारी अंगणात बसून जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर आंबेडकर महाविद्यालयाचे योगेश मोरे यांनी स्व-संरक्षण व स्वयंशिस्तीचे धडे दिले. भटकंतीचे उपक्रमप्रमुख अक्षय पेंडसे, सहउपक्रमप्रमुख विशाल महाडीक यांच्यासह सचिन मेहता, मोनिका भुतकर, धनश्री सूळ, प्रशांत भुतकर, गोपीचंद घाडगे, सारिका पालकर, प्रिया समीर साळुंखे, नूतन जाधव, अशोक बुटाला, विठोबा रेनोसे, विशाल आंबले, आकाश भुतकर, विश्‍वविक्रमी समृद्धी भुतकर, सुजित मोरे, शिवानी मेहता यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. 

आम्ही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेत असतो. पावसाळी भटकंती हा उपक्रम जेणेकरून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती मिळावी, निसर्ग अनुभवायला मिळावा या विचाराने ही सहल घेण्यात आली. यापुढेही असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. 
- सचिन मेहता, अध्यक्ष, कर्तव्य संस्था 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue