सरकारी आरोग्य सेवा प्रथमोपचारापुरती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

खालापुरात संध्याकाळनंतर खासगी दवाखनेही बंद असल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पर्याय उरतो; परंतु या ठिकाणी एकाच डॉक्‍टराच्या खांद्यावर रुग्णसेवेचा भार असल्याने उपचाराला मर्यादा येत आहेत.

खालापूरः तालुक्‍याचे ठिकाण असले तरी दिवस मावळला की इथले सर्व व्यवहार थंड पडत आहेत. सर्वांत गंभीर बाब म्हणजे आरोग्य सेवाही बेभरवशी झाली आहे. उपचाराकरिता धावाधाव करण्याची वेळ खालापूरकरांवर येत आहे. तालुक्‍यातील शासकीय आरोग्य सेवा प्रथमोपचारापुरती मर्यादित आहे.
 
तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सर्वच ठिकाणी डॉक्‍टर, कर्मचारी यांची अपुरी संख्या आहे. शिवाय आरोग्य केंद्रात सोई, स्वच्छतेचा अभाव यामुळे रुग्णाला इतरत्र हलवावे लागते. खालापुरात संध्याकाळनंतर खासगी दवाखनेही बंद असल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पर्याय उरतो; परंतु या ठिकाणी एकाच डॉक्‍टराच्या खांद्यावर रुग्णसेवेचा भार असल्याने उपचाराला मर्यादा येत आहेत. दोन दिवसांपूर्वी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शहा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठीही कोणीच नसल्याने अत्यवस्थ रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते. अखेरीस रुग्णाला खोपोली येथे खासगी रुग्णालयात न्यावे लागले. 108 रुग्णवाहिकाही अलिबाग येथे रुग्ण घेऊन गेली होती. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ झाली. प्रथमोपचार आणि रुग्णवाहिकाही मिळत नसेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राचा फायदा काय, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे.

कलोते येथील रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने रुग्ण तपासणीसाठी गेलो होतो. खालापूरमधील रुग्णाला प्रथमोपचार मिळाले नाहीत, ही बाब खरी असली तरी त्या वेळी ड्युटीवर जबाबदार परिचारिका हजर नसल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे. याची खातरजमा करून मेमो काढण्यात येईल. 
- अनिलकुमार शहा, वैद्यकीय अधिकारी, खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र 

सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांबद्दल खालापूर नागरिकांच्या तक्रारी नाहीत. एक चांगला वैद्यकीय अधिकारी खालापूर आरोग्य केंद्राला मिळाल्याचे ऐकायला मिळते. काही त्रुटी असतील तर त्याबाबत माहिती घेऊ. 
- नरेश पाटील, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद 

आम्ही रुग्णाला घेऊन गेलो त्या वेळी रुग्णालयात अंधार होता. डॉक्‍टर, परिचारिका जागेवर नव्हत्या. रुग्णांची अवस्था अतिशय गंभीर होती. अशावेळी नातेवाईक, नागरिक संतप्त होणारच. खोपोलीत खासगी दवाखान्यात रुग्णाला हलविले; अन्यथा जीव गेला असता. प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुधारणे गरजेचे आहे. 
- राहुल चव्हाण, नगरसेवक 

खासगी दवाखान्यात उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नसते. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्र वर्षानुवर्ष व्हेंटिलेटरवर आहे. खालापूरमधील नागरिकांना कोणी वालीच नाही. 
- अनिल शिंदे, नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue