मुंबई-गोवा महामार्गाचा "धुरळा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

वडखळ ते पेण महामार्ग पूर्णपणे उखडून गेल्याने खड्ड्यांमधून माती वर आली आहे. येथून वाहने गेल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने या महामार्गाचा धुराळा झाला आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. पादचाऱ्यांनाही धुळीचा सामना करावा लागतोय. 

वडखळः मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणे खडतर झाले आहे. त्यातच येथे महामार्गावर आता धुळीचे साम्राज्य पसरले असून, प्रवास करणे कठीण झाले आहे.
 
महामार्गावर वाहतूक कोंडी, खड्डे, अपघात हा नेहमी चर्चेचा विषय आहे. सध्या महामार्गावरून प्रवास करताना धुळीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांतून मातीवर आली आहे. खड्डे बुजविण्याचे काम कुर्म गती सुरू आहे. पाऊस थांबल्यावर आता रखरखित ऊन पडत आहे. त्यामुळे संपूर्ण माती सुकली आहे. बुजविण्यासाठी खडी, माती यांचा वापर केला जात असून काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येत आहेत. ते बसविण्यासाठी बारीक खडी वापरली जात आहे. काही ठिकाणी डांबर खडी टाकून खड्डे बुजविले जात असले तरी त्याच्यावर बारीक खडी टाकली जात असल्याने यावरून वाहने गेल्याने ती उडत आहे.

वडखळ ते पेण महामार्ग पूर्णपणे उखडून गेल्याने खड्ड्यांमधून माती वर आली आहे. येथून वाहने गेल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्याने या महामार्गाचा धुराळा झाला आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. पादचाऱ्यांनाही धुळीचा सामना करावा लागतोय. 

महामार्गावरून वाहन चालविताना उडणारी धूळ जास्त प्रमाणात असल्याने समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे वाहन चालविणे मोठे जोखमीचे ठरत आहे. 
- राजू कडू, रुग्णवाहिका चालक 

महामार्गावरील खड्डे व उडणारी धूळ पाहता दुचाकी चालविणे अवघड होत आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्‍यात आले असून, श्‍वसनाचे विकार होण्याची शक्‍यता आहे. 
- के. जी. म्हात्रे, दुचाकीचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue