शाळांमध्ये शारदोत्सवाचे वारे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

शाळा-शाळांमध्ये साफसफाईला सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक फावल्या वेळेत ही साफसफाई करताना दिसत आहेत. शाळेतील एका वर्गखोलीत देवीसाठी लाकडी आरास किंवा तयार देव्हाऱ्यात सरस्वतीची मूर्ती ठेवून तिची मनोभावे प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही ठिकाणी वर्गखोल्या रंगवण्याची कामेही सुरू आहेत.

पालीः नवरात्रोत्सव म्हटले की नऊ दिवस सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. गावागावांत घटस्थापनेच्या दिवशी देवी बसतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांमध्येही घटस्थापनेला सरस्वती मातेच्या रूपाने देवी बसवली जाते. संपूर्ण नऊ दिवस शाळेत उत्साही व प्रसन्न वातावरण असते. गरबा, हादगाव किंवा भोंडला, नाचाच्या फेऱ्या याबरोबरच विविध कार्यक्रमही शाळेत जोरदार राबविले जातात. सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही तयारीची लगबग दिसत आहे.

शाळा-शाळांमध्ये साफसफाईला सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक फावल्या वेळेत ही साफसफाई करताना दिसत आहेत. शाळेतील एका वर्गखोलीत देवीसाठी लाकडी आरास किंवा तयार देव्हाऱ्यात सरस्वतीची मूर्ती ठेवून तिची मनोभावे प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही ठिकाणी वर्गखोल्या रंगवण्याची कामेही सुरू आहेत. तर काही शाळांमध्ये देवी ठेवणाऱ्या वर्गखोलीची रंगरंगोटी करणे पताके लावणे, रंगीत कागद चिकटवणे, सजावट करणे अशा प्रकारची कामे विद्यार्थी व शिक्षक करताना दिसत आहेत. याबरोबरच सामानाची आवरा आवर करणे विविध वस्तू योग्य ठिकाणी लावणे देवी बसवण्याच्या ठिकाणी विद्युत रोशणाई करणे आदी कामेही सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. 

कार्यक्रमांची जंत्री 
देवी बसलेल्या प्रत्येक शाळेत नऊ दिवस शाळेच्या परिपाठा वेळी देवीची आरती म्हटली जाते. शाळेच्या बाहेर वर्गात आकर्षक रांगोळीही काढली जाते. आरतीचा मान दर दिवशी प्रत्येक वर्ग आणि विद्यार्थ्यांना दिला जातो. देवीसाठी हार-फुले, पूजेचे व साहित्य याची जबाबदारीही शिक्षक, पालक व मुले वाटून घेतात. काही शाळांमध्ये पालकांसाठी नऊ दिवस नऊ देवींची माहिती दिली जाते. रोज फावल्या वेळेत देवीसमोर विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. रास-गरबा खेळतात. एक दिवस भोंडला किंवा हादगावही होतो. मुलांमध्येही अभ्यास करण्यासाठी नवी प्रेरणा आणि ऊर्मी हे नऊ दिवस घेऊन येतात. 

घटस्थापनेची तयारी सुरू आहे. वर्गखोल्यांची साफसफाई करून आता देवी बसणाऱ्या वर्गात पताके व रंगीत कागद लावत आहोत. सजावटीचे काम सुरू आहे. पालकांसाठीही नऊ दिवस विशेष देवींची माहिती फलकावर दिली जाते. 
- अमोल जंगम, मुख्याध्यापक, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, उतेखोल-माणगाव 

वाडीवस्तीवरील मुला-मुलींसाठी नवरंगात नटून येऊन फेर धरायला लावणारा दांडिया, टिपऱ्या व गरबा याचा आनंद पाहायला मिळतो. एकत्रित खाण्याचाचा मिलाफ दर्शवणारा सण आहे. गावातील सर्व महिला, पालक व शाळेला एकसंध करणारा हा शारदोत्सव शक्तीचे रूप, रंगाचे महत्त्व व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाराही आहे. 
- राजेंद्र अंबिके, उपशिक्षक, रजिप शाळा-नेणवली, सुधागड 

शाळेत खूप छान कार्यक्रम होतात. आम्हा लहान मुलींना साडी नेसून नटूनथटून येऊन गरबा खेळायला खूप आवडते. भोंडल्याच्या वेळी विविध खाऊ मिळतो. सर्व मुले नवरात्रोत्सवात शाळेत खूप मजा करतो. 
- प्रिया मनीष पाटील, विद्यार्थिनी, माणगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue