वाहतूक कोंडीचा एसटी बसला विळखा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

ऐतिहासिक महाड शहराची लोकसंख्या वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. शहरात इमारतींच्या पार्किंगचा प्रश्‍न कायम आहेच. शहरात रस्त्यावर लागणाऱ्या विक्रेत्यांच्या गाड्या, दुकानासमोरील खरेदीसाठी थांबलेली वाहने यामुळे शहरात विविध रस्त्यांवर कायमची वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

महाडः शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस किचकट होत चालली आहे. मुख्य रस्त्यांवरील दुकानांसमोरील गचाळ पार्किंग, दोन्ही दिशेला लागणारी वाहने आणि पोलिसांची पोकळ कारवाई यामुळे शहरातून जाणाऱ्या एसटी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाहने बाजूला केली जात नसल्याने एसटीला ताटकळत उभे राहावे लागत आहे.

ऐतिहासिक महाड शहराची लोकसंख्या वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. शहरात इमारतींच्या पार्किंगचा प्रश्‍न कायम आहेच. शहरात रस्त्यावर लागणाऱ्या विक्रेत्यांच्या गाड्या, दुकानासमोरील खरेदीसाठी थांबलेली वाहने यामुळे शहरात विविध रस्त्यांवर कायमची वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतुकीबाबत केवळ कागदावर आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

महाडमधील मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरातील काही रस्ते नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केले आहेत; मात्र याबाबतही ठोस कारवाई झाली नाही. याचा त्रास मात्र एसटी बसेसना अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते एसटी बसस्थानकापर्यंतच्या छत्रपती शिवाजी मार्गावर अपना बाजार, राजमाता जिजाऊ गार्डन, हॉटेल वेलकम, प्रांत कार्यालय कॉर्नर या भागात कायम वाहतूक कोंडी होते. या मार्गावर मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटीच्या बसेस, बिरवाडी, पोलादपूर, किल्ले रायगड या मार्गावरील बसेस एसटी बसस्थानक ते शिवाजी चौक या दरम्यान कायम या वाहतूक कोंडीत अडकत आहेत. दोन्ही बाजूला वाहने लावून वाहनचालक खुशाल जात असल्याने एसटी बस त्यातून निघणे कठीण होत आहे. यामुळे प्रवाशांनाही त्रास होत असतो.

एसटीचालकाला अनेक वेळा वादाला सामोरे जावे लागत आहे. हीच अवस्था प्रांत कार्यालय ते स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पुढे महावीर कपड्याचे दुकान, बॅंक ऑफ बडोदा या परिसरातही असते. विद्यार्थी सुटल्यानंतर पालकांच्या वाहनांची गर्दी आणि दोन्ही बाजूने ये-जा करणारे विद्यार्थी यामुळे ही वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी काही दिवस वाहतूक पोलिस उभे केले जात होते; परंतु परत परिस्थिती जैसे थे आहे. 

खाडीपट्ट्यात जाणाऱ्या बसेसनाही वीरेश्‍वर मंदिर ते परांजपे विद्यालय या परिसरात अडथळा निर्माण होत आहे. कोंडीमुळे प्रवास करणे नकोसे झाले आहे. 
- मनोहर सुपे, प्रवासी 

प्रवाशांच्या सोईसाठी शहरातून एसटी वाहतूक केली जाते; परंतु वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत पालिका व पोलिस प्रशासनाला पत्र लिहून कळवण्यात येईल. 
- शिवाजी जाधव, वाहतूक नियंत्रक, महाड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue