पालीत आदिवासींचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पाली : सुधागड तालुक्‍यातील गोंदाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. विविध सरकारी योजना; तसेच दाखल्यांपासून वंचित राहावे लागल्याने आदिवासींच्या प्रगती व विकासाला खीळ बसली आहे. अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे न्याय्य हक्कांसाठी शेकडोच्या संख्येने आदिवासी कातकरींनी बुधवारी ‘लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्थे’च्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांच्या नेतृत्वाखाली पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

या वेळी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. गोंदाव आदिवासी वाडीतील आदिवासींना अजूनही जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आदिवासी कातकरी समाजाच्या उत्कर्षासाठी असलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्याचा संताप आदिवासी कातकरींनी केला.

या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांनी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. आदिवासी वाड्यांभोवती विकासक व प्रकल्पधारकांनी वेढा घातला आहे. त्यामुळे जगणे कठीण झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या वेळी अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, हाडक्‍या वाघमारे, श्रावण वाघमारे, कुशा पवार, सुरेश वाघमारे, धाकी वाघमारे, बेबी वाघमारे, शकुन वाघमारे, मंदा वाघमारे, कुसुम वाघमारे उपस्‍थित होते. 

आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सध्या आचारसंहिता असून निवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. ५ नोव्हेंबरला गोंदाव आदिवासी वाडीवर सर्व विभागाचे प्रमुख सरकारी अधिकारी व ग्रामस्थ यांच्यासमवेत बैठक बोलवली आहे. यावेळी आदिवासींचे प्रश्न व समस्यांची सोडवणूक केली जाईल.
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड तालुका 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue