भारतीय दरवर्षी पचवतात कोट्यवधींची औषधे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

फार्मासिस्ट झाल्यावर रुग्णाला दैवत मानून त्याच्यासाठी देवदूत म्हणून त्याला सेवा देणे अंगीकारावे. अजूनही आपल्याकडे अशिक्षित रुग्ण येत असतात. त्यांना औषधाच्या वेळा आणि मात्रा कशा द्याव्यात हे समजाऊन सांगून औषधांचे दुष्परिणाम आवर्जून सांगावेत. 

नेरळः ऑनलाईनमुळे मादक औषधांचा दुरुपयोग होऊन व्यसनाधीनतेची भीती आहे. गर्भपाताचे कीट उपलब्ध होऊन त्याचाही दुरुपयोग होऊ शकतो. आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 135 कोटी असली तरी दर वर्षी 200 कोटी रुग्ण औषधे खरेदी करतात. त्यामुळे 21 हजार कोटी रुपयांचा नफा फार्मसी व्यवसायाला होतो. विशेष म्हणजे एक लाख 34 हजार कोटी रुपयांची औषधे दर वर्षी भारतीय पचवतात, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे यांनी येथे दिली.
 
कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित जागतिक "फार्मासिस्ट डे'मध्ये झगडे बोलत होते.

 
झगडे म्हणाले, 1947 साली भारतीयांचे आयुर्मान सरासरी 32 वर्षे होते. आता ते 69 वर्षे आहे. यामागे आपल्या सर्व फार्मासिस्टचे योगदान आहे. देशातील आठ लाख फार्मसीमध्ये आठ लाख फार्मासिस्ट आहेत. काही ठिकाणी फार्मासिस्ट जागेवर नसतात. खरे तर अपरान घालूनच फार्मासिस्टने दुकानात उपस्थित राहावे. फार्मासिस्ट झाल्यावर रुग्णाला दैवत मानून त्याच्यासाठी देवदूत म्हणून त्याला सेवा देणे अंगीकारावे. अजूनही आपल्याकडे अशिक्षित रुग्ण येत असतात. त्यांना औषधाच्या वेळा आणि मात्रा कशा द्याव्यात हे समजाऊन सांगून औषधांचे दुष्परिणाम आवर्जून सांगावेत. 

फार्मासिस्टनी रुग्णांशी 
संवाद साधावा! 
ब्रिज सारडा म्हणाले, औषधांच्या दुकानांना मेडिकल स्टोअर्स, केमिस्ट असे संबोधले जाते. त्याऐवजी फार्मसी म्हणून उल्लेख केला तर ते योग्य ठरेल. परदेशात औषध घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला औषधांची माहिती परिपूर्ण दिली जाते. त्यामुळे औषधांचा कसा उपयोग करावा? याबद्दलची परिपूर्ण माहिती रुग्णाला मिळते. तेथील फार्मासिस्ट रुग्णाशी वेळ काढून संवाद साधतात. त्याची आवश्‍यकता आपल्याकडेही आहे. साहेबराव साळुंखे, शशांक म्हात्रे यांनीही मार्गदर्शन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue