स्वाती पाटील मृत्यूप्रकरणी आरोपींना अटक करा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

18 ऑगस्टला नीलेश स्वातीसोबत गडब येथील शेतावर गेला होता. येथील शेतविहिरीत पडल्याची घटना घडली व तिचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. स्वाती हिला चांगल्या प्रकारे पोहता येत असल्याने तिचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही. ती ज्या विहिरीत बुडाली तिची उंची व खोली पाहता स्वातीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.

पेण : तालुक्‍यातील गडब येथे राहणाऱ्या स्वाती पाटील या विवाहितेच्या मृत्यूबाबत पती, सासू यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी त्यांना वडखळ पोलिसांनी अटक केली नाही. याबाबत स्वातीचे वडील मच्छिंद्र पाटील व आई गायना पाटील यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची मंगळवारी (ता. 24) भेट घेऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
 
स्वाती पाटील (वय 22, रा. बळवली, ता. पेण) यांचा विवाह गडब येथील नीलेश पाटील याच्याशी चार महिन्यांपूर्वी झाला होता. 18 ऑगस्टला नीलेश स्वातीसोबत गडब येथील शेतावर गेला होता. येथील शेतविहिरीत पडल्याची घटना घडली व तिचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. स्वाती हिला चांगल्या प्रकारे पोहता येत असल्याने तिचा बुडून मृत्यू होऊ शकत नाही. ती ज्या विहिरीत बुडाली तिची उंची व खोली पाहता स्वातीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. स्वातीचे लग्न झाल्यापासून पती व सासू मानसिक छळ करत असल्याचा आरोप स्वातीच्या कुटुंबाने केला आहे; मात्र याबाबत वडखळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती.

याबाबत स्वातीचे कुटुंब व बळवली ग्रामस्थांनी व महिलांनी 26 ऑगस्टला वडखळ पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन केल्यानंतर पती नीलेश नामदेव पाटील, सासू निर्मला नामदेव पाटील यांच्याविरोधात वडखळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला; मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिना होत आला तरी पती नीलेश पाटील याला अटक केलेली नाही. कलम 302 नुसार गुन्हा दाखल असलेला आरोपी राजरोस फिरत आहे. कंपनीत दररोज कामावर जात असताना तो पोलिसांना सापडत नसल्याचा आरोपही स्वातीच्या कुटुंबाने केला आहे. याप्रकरणी 5 सप्टेंबरला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट पोलिसांचा दबाव आमच्यावर असल्याचा आरोप स्वातीच्या कुटुंबाने गृहराज्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. 

तक्रारदारांच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे; मात्र या आरोपींविरोधात अद्याप कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झाला नाही. फॉरेन्सिक लॅबचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिस निष्कर्षापर्यंत पोहचता येईल. कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जात नाही व जाणार नाही. योग्य पुरावे मिळाल्यावर अटक केली जाईल. 
- अजित शिंदे , सहायक पोलिस निरीक्षक, वडखळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue