मुरूडचा पर्यटन व्‍यवसाय ‘पाण्‍यात’

संग्रहित
संग्रहित

मुरूड : गतवर्षापेक्षा यंदा मुरूडच्या पर्यटन व्यवसायाला पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुरूडमधील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मुरूडमधील पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत दीडपट जास्त पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. गतवर्षी २७५० मिलिमीटर इतका पाउस पडला होता; मात्र यंदा आतापर्यंत तहसील खात्याच्या नोंदीनुसार चार हजार २४ मिलिमीटर इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे हॉटेल व्यावसायिकांसह लॉजिंग, नारळपाणी, भेलपुरी, पाणीपुरी, आईसक्रीम पार्लर, वडापाव स्टॉल, स्नॅक्‍स, चहा विक्रेते, टांगेवाले सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांना झळ सोसावी लागत आहे. 

हिरवाईने नटलेल्या ऐतिहासिक जंजिरा-मुरूडला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. ऐतिहासिक जंजिरा किल्ला मेरीटाईम बोर्डाच्या आदेशाप्रमाणे १ सप्टेबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला; मात्र उधाणामुळे तसेच खवळलेल्या समुद्रामुळे इंजिन बोट सेवा थांबवण्यात आली. खोराबंदरातील मुरूड-जंजिरा पर्यटन सहकारी संस्थेचे इंजिन बोट मालक मेहबूब हद्दादी यांनी सांगितले, की समुद्र खवळलेला असल्याने इंजिन बोट सोडता आली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जंजिरा व दिघी सेवा सुरू करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

घोडागाडी चालक मनोज रामकृष्ण पाटील यांनी सांगितले, की बीचवर १८ ते २० घोडागाडी चालक या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात; परंतु जुलैपासून घोड्यांचा दाणा-चाराही वसूल होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंसिद्धा लॉजिंग बोर्डिंगचे व्यवस्थापक संजय गुंजाळ यांनीही पावसामुळे पर्यटकांची संख्या घटल्याचे मान्य केले.

मुरूडच्या पर्यटन विकासासाठी पालिका प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. किनारा सुशोभीकरणासाठी सरकारकडे प्रस्ताव सादर केले आहेत. निधीची प्रतीक्षा आहे.
- पी. के. आरेकर, नियोजन व पर्यटन समिती सभापती, मुरूड नगरपालिका

राजपुरी बंदरात १३ शिडाच्या बोटी सुरू आहेत, परंतु जोरदार वाऱ्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची संख्या गतवर्षीपेक्षा निम्म्याहून कमी झाली आहे.
-ईस्माईल अदमाने, अध्यक्ष, जंजिरा जल पर्यटक सहकारी संस्था मर्यादित, राजपुरी

जुलैपासून जोरदार पाऊस पडल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली, परंतु रस्तेही अत्यंत खराब झाल्याने पर्यटकांना यायला वेळ अधिक लागतो. जुलैमध्ये ३० टक्के, ऑगस्टमध्ये ५०; तर सप्टेंबरमध्ये ४० टक्के एवढाही व्‍यवसाय न झाल्याने दरमहा ५० हजारहून अधिक तोटा होत आहे.
- शोएब मलिक, मालक, मुरूड मरिना रिसॉर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com