सर्पदंशामुळे जीव टांगणीला!

संग्रहित
संग्रहित

रोहा : रोहा तालुक्‍यात सर्प व विंचूदंशाच्या घटनांत गेल्या चार वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. तालुक्‍यातील विकासकामे व सापांच्या अधिवासावर अतिक्रमण हे याचे प्रमुख कारण आहे. २०१५-२०१६ या वर्षात रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या सर्पदंश रुग्णांची संख्या ६० होती; तर विंचूदंश झालेल्या रुग्णांची संख्या १४४ होती. २०१८-२०१९ मध्ये ही संख्या अनुक्रमे १३५ व २५० होती.   

तालुक्‍यात होत असलेली विकासकामे, रस्त्यांची वाढ, विकासकामांसाठी फोडले जाणारे डोंगर, नष्ट होणारी जंगले, वरकस जमिनी व माळरानावर विकसित होणारे रिसॉर्ट या सर्व कारणांमुळे सापांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत. माणूस सापांच्या अधिवासात शिरकाव करत आहे. सापांची फिरण्याची व अन्न शोधण्याची ठिकाणे निश्‍चित झालेली असतात. अशा वेळी त्या ठिकाणी बांधकाम किंवा घरे झालेली असल्यास ते माणसांच्या संपर्कात येतात. त्यामुळे सर्प किंवा विंचूदंश होऊ शकतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. माणसांनी सावधानता बाळगल्यास सर्पदंश टाळले जाऊ शकत असल्याचे सर्पमित्र सांगतात. 

कापणी हंगामात सर्वाधिक प्रमाण 
पावसाळ्यात सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातही कापणीच्या हंगामात हे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहून शेतीची कामे करावीत, असा सल्ला सर्पमित्रांनी दिला आहे. निसर्गाची अन्नसाखळी व प्रजोत्पादन हे एकमेकांशी जोडलेले असते. पावसाळा सर्व पशू-पक्ष्यांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो. या वेळी कीटक, बेडूक व सापही प्रजोत्पादन करतात. पावसाळ्यात त्यांची संख्या वाढते व भक्ष्य पकडण्यासाठी ते शेतात, मळ्यात फिरतात. तो त्यांचा नैसर्गिक अधिवास असतो.  शेतीची कामे करत असताना शेतकऱ्यांचा पाय सापावर पडतो अथवा त्यांच्या अधिक निकट गेल्याने साप व विंचू चावण्याच्या घटना घडतात. 

जून ते सप्टेंबर महिन्यात सर्प व विंचू चावण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. या दिवसात शेतीची कामे सुरू असतात. तसेच सापांचा प्रजोत्पादन काळ असल्याने संख्या वाढलेली असते. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण या दिवसात सर्वाधिक असते. मात्र शेतात व रानात फिरताना थोडी सावधानता बाळगली तर या घटना सहज टाळता येतील.
- आनंद मोहिते, सर्पमित्र

गेल्या चार वर्षांत रुग्णालयात येणाऱ्या सर्पदंश व विंचूदंश झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.
- स्नेहल शेवडे, ज्येष्ठ परिचारिका, उप-जिल्हा रुग्णालय. रोहा 

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. मात्र आपापला जीव वाचवण्यासाठी दोघेही एकमेकांच्या जीवावर उठतात. त्यातून सर्पदंश होण्याच्या घटना घडतात; तर कधीकधी सापही मारला जातो. मात्र थोडी सावधानता बाळगली तर या घटना सहज टाळता येतील. 
- चंद्रशेखर सप्रे, ज्येष्ठ सर्पमित्र, अध्यक्ष, निसर्ग गिरिभ्रमण संस्था
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com