पेण अर्बन संघर्ष समिती नशीब आजमावणार

संग्रहित
संग्रहित

खोपोली : पेण अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांना गेली नऊ वर्षे न्याय मिळत नसल्याने विधानसभा निवडणुकीत पेण अर्बन बॅंक संघर्ष समिती रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात निवडणुका लढविणार असल्याची घोषणा संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी शनिवारी केली. 

रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर, उरण, पेण-सुधागड आणि अलिबाग या चार मतदारसंघात पेण अर्बन बॅंक संघर्ष समिती उमेदवार उभे करणार आहे. या वेळी समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनाच कर्जतमधून निवडणुकीला उभे राहण्यासाठी गळ घातली. परंतु, त्यांनी निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिल्याने सर्व ठेवीदारांनी एकमताने कर्जतमधून समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यामुळे जाधव यांची उमेदवारी या वेळी संघर्ष समितीचे सचिव चिंतामण पाटील यांनी जाहीर केली. अन्य तीन ठिकाणचे उमेदवार काही दिवसांत जाहीर करणार असल्याचे यांनी सांगितले. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांच्यासमवेत समितीचे सचिव चिंतामण पाटील, शिरीष बिवरे, मोहोपाडा येथील गजानन गायकर, कर्जतचे मधुकर गायकवाड, बाबू शेख आदी संघर्ष समिती पदाधिकारी व ठेवीदार उपस्थित होते.

प्रमुख उमेदवारांना धक्का
कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात पेण बॅंकेच्या खोपोली, शिळफाटा, वावोशी, कर्जत, नेरळ व माथेरान अशा सहा ठिकाणी शाखा आहेत. यात ९० हजारांहून अधिक खातेदार व ठेवीदार आहेत. सिद्धिविनायक या अवसायनात गेलेल्या बॅंकेचेही आठ हजार ठेवीदार असून, नुकत्याच निर्बंध आलेल्या पीएमसी बॅंकेचे १५ हजार ठेवीदार कर्जत-खालापूर मतदारसंघात आहेत. या सर्वांना एकत्र करून या मतदारसंघात पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे नरेन जाधव यांनी सांगितले. उरण मतदारसंघात दोन शाखांमध्ये एकूण ३० हजार ठेवीदार आहेत. संघर्ष समितीच्या या उमेदवारांमुळे रायगड जिल्ह्यात चारही मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना धक्का बसणार आहे.

गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी समितीला फक्‍त आश्‍वासने दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याऐवजी नरेन जाधव व संघर्ष समिती, कर्जत मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. यातून त्यांना नेमका ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावयाचा आहे की? ज्यांनी पाच वर्षे सत्ता असून काहीही केले नाही, त्यांना राजकीय मदत करावयाची आहे; हा संशय निर्माण होत आहे. या मागील नेमका सूत्रधार कोण, या बाबतही संशय आहे. तरीही संघर्ष समितीने नरेन जाधव यांना कर्जतमधून विधानसभा निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला असेल तर हा त्यांचा निर्णय आहे. 
सुरेश लाड, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कर्जत-खालापूर मतदारसंघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com