जिल्ह्यात 107 अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल, कर्जत, पेण, महाड, अलिबाग आणि श्रीवर्धन हे मतदारसंघ आहेत. सर्वच मतदारसंघात उमेदवारीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काही ठिकाणी तर युती, आघाडीचा धर्म बाजूला सारत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक लक्षवेधी ठरली आहे. 

अलिबागः नाराजांची मनधरणी, युती-आघाडीचा धर्म बाजूला सारत दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज, अभूतपूर्व पक्षांतर अशा स्थितीत शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 107 अर्ज दाखल झाले. सर्वात अधिक अर्ज अलिबाग मतदारसंघातून दाखल आहेत. अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस सोमवारी आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

रायगड जिल्ह्यात उरण, पनवेल, कर्जत, पेण, महाड, अलिबाग आणि श्रीवर्धन हे मतदारसंघ आहेत. सर्वच मतदारसंघात उमेदवारीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काही ठिकाणी तर युती, आघाडीचा धर्म बाजूला सारत बंडखोरी झाली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक लक्षवेधी ठरली आहे. 

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 45 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात अधिक उमेदवारी अर्ज अलिबाग मतदारसंघातून दाखल झाले आहेत. या मतदारसंघात आघाडीचा धर्म बाजूला ठेवून कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारीवरून कॉंग्रेसच्या ठाकूर कुटुंबामध्येच वाद निर्माण झाला होता, असे समजते. अखेर या कुटुंबांतील राजेंद्र ठाकूर, ऍड. श्रद्धा ठाकूर, प्राची ठाकूर या तिघांनी अर्ज भरले आहेत. कर्जतमध्ये नाराजी अधिक असेल, असा अंदाज होता; परंतु सर्वात कमी (12) उमेदवारी अर्ज कर्जतमधून दाखल केले आहेत. या मतदारसंघात युतीच्या नेत्यांनी एकत्र येत महेंद्र थोरवे यांचा उमेदवारी अर्ज यापूर्वीच दाखल केला आहे. शेवटच्या दिवशी अन्य इच्छुकांचे अर्ज येण्याची शक्‍यता होती.

दरम्यान, युतीच्या वरिष्ठ नेत्यांना स्थानिक कार्यकर्त्यांची मने वळविण्यात यश मिळविल्याने येथील वादंग मिटले आहे. श्रीवर्धनमध्येही 13 जणांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी दाखल केली आहे. उरण आणि पनवेलमध्येही युती, आघाडीचा धर्म पाळण्याऐवजी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी (ता.7) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने ज्या नाराज उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांची मनधरणी करून त्यांना अर्ज मागे घेण्यास विनंती करण्याची कसरत वरिष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे. जिल्ह्यात 107 अर्ज दाखल झाले. 

अखेरच्या दिवशी दाखल झालेले अर्ज 
पनवेल -11 
कर्जत- 8 
उरण- 8 
पेण- 18 
अलिबाग- 26 
श्रीवर्धन- 13 
महाड- 8 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue