तेलंगे मोहल्ल्यात घराला आग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

भडकलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणताच उपाय नसल्याने पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण घर आगीमध्ये भस्मसात झाले.

महाडः तालुक्‍यातील तेलंगे मोहल्ला या खाडीपट्ट्यातील गावामध्ये रविवारी (ता. 6) सायंकाळी 6 च्या सुमाराला घराला लागली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची बातमी गावामध्ये समजल्यानंतर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले. भडकलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी कोणताच उपाय नसल्याने पालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण घर आगीमध्ये भस्मसात झाले. तेलंगे मोहल्ला गावामध्ये दाट लोक वसाहतीमध्ये अश्रफ कारविनकर यांचे घर आहे. रविवारी संध्याकाळी घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

आगीची बातमी मोहल्ल्यामध्ये समजताच ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. कारविनकर यांचे घर दाट लोकवसाहतीमध्ये असल्याने त्यांच्या घराला लागलेली आग अन्य घरांना लागण्याची शक्‍यता असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्वरित तालुका पोलिस ठाण्यामध्ये आगीची बातमी कळविण्यात आल्यानंतर एमआयडीसी आणि पालिकेची अग्निशमन पथके घटनास्थळी रवाना झाली. सुमारे दीड तासाने आगीवर नियंत्रण आणण्यामध्ये यश आले. आगीमध्ये घराचे पूर्ण नुकसान झाले असून, सुमारे दहा लाखापेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या दुर्घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue