पावसाच्या लहरीपणाची शेतकऱ्यांना धास्ती 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यात आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे. दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी भातपीक तयार झाले आहे. ते कापणीयोग्य होण्याच्या स्थितीत आहे; मात्र पावसामुळे ते आडवे झाले आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास त्याला कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. भातपीक कापणीसाठी तयार झाले असताना परतीच्या पावसाचा तडाख्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

खालापूर ः जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस सुरू झाला आहे. उशिरा पण दमदार झालेल्या पावसाने यंदा भातशेती चांगलीच बहरली असली तरी हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. काही ठिकाणी पीक पावसामुळे आडवे झाले आहे. त्यामुळे नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांची गाळण झाली. 

खालापुरात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3000 हेक्‍टर आहे. या वर्षी 2754 हेक्‍टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली आहे. या क्षेत्रापैकी हळवे व निमगरवे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, गरवे क्षेत्र अल्प प्रमाणात आहे. विशेष म्हणजे निवडक शेतकऱ्यांना भातपिकाच्या जोडीला तुरीचे बियाणे वाटप केले होते. त्यामुळे बांधावर 7.40 हेक्‍टर तुरीची लागवड झाली आहे. कृषी विभागातर्फे भातपिकामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भातपिकाचे कर्जत 5, कर्जत 7 आणि कर्जत 9 या बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. यामध्ये चारसूत्री भात लागवड, सगुणा भात तंत्रज्ञान वापरून लागवड तसेच रम सीडर अशा तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली आहे. या तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने लागवड न करता या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले होते.

भातपिकासोबत कृषी विभागाने निवडक शेतकऱ्याने पन्नास किलो तुरीचे बियाणे वाटप केले होते. बांधावर तुरीची लागवड केल्याने भातपिकासोबत तूर पिकाचे अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे. भातपिकावर येणाऱ्या रोग व कीडरोगाबाबत कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजना करण्यासाठी माहिती देण्यात येत आहे.

जिल्ह्यात आता परतीचा पाऊस सुरू झाला आहे. दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी भातपीक तयार झाले आहे. ते कापणीयोग्य होण्याच्या स्थितीत आहे; मात्र पावसामुळे ते आडवे झाले आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास त्याला कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. भातपीक कापणीसाठी तयार झाले असताना परतीच्या पावसाचा तडाख्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने कृषी विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

कृषी विभागातर्फे भातपिकाच्या पेरणीपूर्व कामापासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दहा शेतीशाळांचे आयोजन केले होते. सध्याचे हवामान पाहता शेतकऱ्याने कापणी करताना हवामानाचा अंदाज घ्यावा. शक्‍य असल्यास कापणी केलेले पीक शेतात न ठेवता शक्‍य असल्यास लगेच झोडणी करून व्यवस्थित ठेवावे. शेतात कापणी करून पिकाची उडवी केली असल्यास त्यावर ताडपत्री अंथरून पावसापासून संरक्षण करावे. 
- अर्चना सूळ, कृषी अधिकारी, खालापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue