अधिकाऱ्यांविरोधात आत्मदहनाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

शेकडो आदिवासी एकत्र आले. तेथे पोहचल्यानंतर संबंधित कारवाई शेतकऱ्यांना अंधारात ठेवून करणारे वन अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सर्वांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेरळः ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीतील शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित भातशेतीवर वन विभाग आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करीत शेती उद्‌ध्वस्त केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

या प्रकाराची माहिती कळताच आदिवासी समाज, तालुका आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटनेच्या वतीने संदेशाद्वारे सर्व आदिवासी ग्रुपवर माहिती टाकून तत्काळ तेलंगवाडीतील जागेवर जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेकडो आदिवासी एकत्र आले. तेथे पोहचल्यानंतर संबंधित कारवाई शेतकऱ्यांना अंधारात ठेवून करणारे वन अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सर्वांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटना, तालुका महादेव कोळी संघटना, कर्जत तालुका आदिवासी सेवा मंडळ, मुरबाड तालुका आदिवासी संघटना, अंबरनाथ तालुका आदिवासी संघटना आणि इतर संघटना मिळून पीडित तेलंगवाडी-भोपळीचीवाडी येथील आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचा निर्णय सर्वांनी घेतला.

या वेळी तालुका आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, उपाध्यक्ष मंगळ केवारी, आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादा पादिर, खजिनदार बुधाजी हिंदोळा, माजी अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष परशुराम दरवडा, सहखजिनदार अर्जुन केवारी, सहसचिव दत्तात्रय हिंदोळा आदींनी हा निर्णय घेतला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue