कर्जतमध्ये दोन्ही रुग्णवाहिका बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

2012 मध्ये कार्यान्वित केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून चालविली जाणारी नॅशनल मोबाईल रुग्णवाहिका जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यातील आदिवासी भागात चालविली जाते. 2012 मध्ये आलेल्या दोन्ही रुग्णवाहिका आता नादुरुस्त झाल्या आहेत.

नेरळः कर्जत तालुक्‍यातील आदिवासींची गरज बनलेल्या नॅशनल मोबाईल युनिटच्या दोन्ही रुग्णवाहिका बंद पडल्या आहेत. एप्रिलपासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पगार नाही आणि औषध पुरवठा उपलब्ध नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांनी काम थांबवले आहे. दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिका यामुळे त्या जंगलात, दुर्गम भागात बंद पडत असल्याबद्दल सरकारला कळवूनही सुस्त प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

राज्य सरकारने आदिवासी भागाला रुग्ण सेवा देण्यासाठी नॅशनल मोबाईल युनिट 2012 मध्ये कार्यान्वित केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून चालविली जाणारी नॅशनल मोबाईल रुग्णवाहिका जिल्ह्यात कर्जत तालुक्‍यातील आदिवासी भागात चालविली जाते. 2012 मध्ये आलेल्या दोन्ही रुग्णवाहिका आता नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे त्या गाड्या जंगल भागात कुठे बंद पडत होत्या; मात्र त्या रुग्णवाहिकांसाठी नेमण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी त्याही स्थितीत काम केले. मात्र, एप्रिल 2018 पासून या युनिटची जबाबदारी पुणे येथील शतायुषी फाऊंडेशनला दिली.

पहिल्या दिवसापासून या संस्थेने औषध पुरवठा पूर्ण महिन्याचा पुरविला नाही. आठ दिवसाला पुरेल एवढा औषध साठा संपल्यानंतर गाडी फिरत होती. रुग्णांना तपासात होती; पण औषध पुरवठा करीत नव्हती. त्यानंतर त्या दोन्ही रुग्णवाहिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शतायुषी संस्थेने पगार दिला नाही. त्याबद्दल कर्जत तालुक्‍याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांना ऑगस्ट 2018 मध्ये पत्र देऊन युनिटची माहिती दिली. डॉ. देसाई यांनी त्याबाबत पुढे राज्य सरकारचे आरोग्य संचालक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना कर्जत तालुक्‍यातील मोबाईल रुग्णवाहिकांचा स्थितीत कळविली; पण राष्ट्रीय आरोग्य अभियानही काही करीत नसल्याने दोन डॉक्‍टर, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि दोन व्हॅनचालक यांनी आपले पाच महिन्यांचे पगार थकले म्हणून आपल्या मुख्यालयी कशेळे ग्रामीण रुग्णालयातबसून राहणे पसंत केले आहे. गेल्या आठ दिवसापासून या दोन्ही रुग्णवाहिका पूर्णपणे बंद पडल्या आहेत. 

आमच्या आदिवासी भागाला या मोबाईल रुग्णवाहिका आधार होता .मात्र रुग्णवाहिका बंद पाडण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचे वाटत आहे. यामुळे आदिवासी लोकांची गैरसोय होत असून शासन सांगणार असेल तर आम्ही पैसे काढून कामगारांना मदत करू. 
- भरत शिद, अध्यक्ष, आदिवासी संघटना 

कर्जत तालुक्‍यातील मोबाईल युनिट बाबत राज्य सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना तात्काळ कळविले आहे. थकीत पगार आणि रुग्णसेवा थांबण्यास जबाबदार असणाऱ्या संस्थेवर कारवाई शासनाने सुरु केली आहे. 
- डॉ. सचिन देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue