दादली पुलावरील वाहतूक धोक्‍याची 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

पुलांच्या तपासणीनंतर हे तिन्ही पूल दुरुस्त करणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पावसाळ्यापूर्वीच या पुलांवर फलक लावण्यात आले; मात्र कारवाई न झाल्याने हे पूल अवजड वाहनांकरिता सुरूच होते; मात्र यातील केवळ आंबेत पूलच बंद केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

महाड ः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा बाणकोट खाडी (सावित्री नदी)वरील आंबेत पूल कमकुवत झाल्याने अचानक बंद केला आहे. त्यामुळे एसटी बसेस आणि त्यातील प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. या प्रवाशांना जवळपास तीस किलोमीटरचा अधिक प्रवास करावा लागत आहे. 35 रुपयांचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ही वाहतूक महाडमधील दादली पूल मार्गे होत असल्याने दादलीच्या धोकादायक पुलावरील वाहतूकही वाढली आहे.

सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. महाडजवळील दादली आणि टोळ या पुलांबरोबर आंबेत पुलाचीही तपासणी पाण्याखालून करण्यात आली. यामध्ये हे तीन पूल खालील बाजूने दुरुस्तीची गरज असल्याचे मत सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीने दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने हे तिन्ही पूल अवजड वाहतुकीला बंद असल्याचे फलक लावले; मात्र तरीही अवजड वाहतूक सुरूच राहिली.

जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी आंबेत पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये ट्रक, वाळू वाहून नेणारे डंपर, बांधकाम यंत्रे, ट्रेलर आणि प्रवासी वाहतूक बसेसचाही समावेश केला आहे. यामुळे मंडणगड आणि दापोलीवरून मुंबईला जाणाऱ्या बसेस आणि मुंबईवरून दापोली आणि मंडणगडकडे जाणाऱ्या बसेस या लाटवण तसेच म्हाप्रळ, चिंभावे महाड या मार्गे वळवण्यात आल्या. या सर्व बसेस मुंबई आणि इतर आगाराच्या असल्याने महाडमधून जाणारा मार्ग त्यांना कळत नसल्याने रस्ते चुकण्याची वेळ गेले दोन दिवस एसटीचालकांवर आली आहे.

महाड एसटी आगारात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेस शहरातील महात्मा गांधी मार्ग, छत्रपती शिवाजी मार्ग या मार्गावर असलेल्या जोडरस्त्यावर वळत असल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. ही वाहतूक मुळातच कमकुवत असलेल्या दादली पुलावरून होत असल्याने पुलाचा धोका वाढला आहे. प्रवाशांना महाड मार्गे जादा 30 किमी व 35 रुपये अधिक रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे. महाडजवळील टोळ, दादली आणि आंबेत हे पूल एकाच सालात बांधण्यात आले आहेत. 

या पुलांच्या तपासणीनंतर हे तिन्ही पूल दुरुस्त करणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पावसाळ्यापूर्वीच या पुलांवर फलक लावण्यात आले; मात्र कारवाई न झाल्याने हे पूल अवजड वाहनांकरिता सुरूच होते; मात्र यातील केवळ आंबेत पूलच बंद केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

आंबेत पूल बंद झाल्याने एसटी बस महाड मार्गे येत आहेत. पूल बंद झाल्याचे बांधकाम विभागाने कळविले आहे. प्रवाशांना जादा तिकिटाचा अधिभार सोसावा लागत आहे. 
- अनंत कुलकर्णी, आगार व्यवस्थापक, महाड 

एका कमकुवत पुलावरील वाहतूक दुसऱ्या कमकुवत पुलावरून होतेय. शिवाय प्रवाशांना जास्त तिकीट द्यावे लागते. महाडमधून वाहतूक कोंडीत अडकावे लागते. याचा विचार व्हायला हवा. 
- विलास जाधव, प्रवासी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue