खालापुरात प्रवास धोक्‍याचा 

सावरोली- खारपाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरीवर रस्ता खचला आहे
सावरोली- खारपाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरीवर रस्ता खचला आहे

खालापूर : खालापूर तालुक्‍यातील महत्त्वाचा राज्यमार्ग असलेल्या सावरोली- खारपाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरीवर रस्ता खचल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून गेल्या पाच वर्षांत या रस्त्यावर खर्च झालेला निधी कोटींच्या घरात आहे. परंतु रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने खर्च झालेला निधीच खड्ड्यात गेला आहे. या रस्तेदुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे 

सावरोली-खारपाडा रस्त्याची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, साईडपट्टी भरणे यावर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला होता. परंतु कंत्राटदार आणि अधिकारी याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले आहेत. अवजड वाहतुकीमुळे अरुंद रस्ता आणखी धोकादायक झाला आहे. आमसभेतदेखील सावरोली-खारपाडा रस्त्याचा मुद्दा गाजून तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. अखेरीस वर्षभरापूर्वी 40 कोटीचा निधी रस्त्यासाठी मंजूर झाला. परंतु 40 कोटीची निविदा निघूनसुद्धा कंत्राटदार मिळत नसल्याने रस्त्याचे काम रखडले होते. अखेरीस रस्त्याला कंत्राटदार मिळाला आणि रस्त्याच्या कामाचा नारळ फुटला.

पावसाळ्यापूर्वी 15 किलोमीटरचा रस्ता पूर्ण करण्यात आला. वाशिवली, वानिवली, माजगाव, माडप कुंभिवली भागात पावसाळी नाल्यावर नव्याने मोरीचे बांधकाम करण्यात आले. पावसाळ्यात सर्वच मोरीवर रस्ता अर्ध्या फुटापेक्षा जास्त खचला आहे. वाशिवलीजवळ मुसळधार पावसात अर्धा रस्ताच वाहून गेला होता. या मार्गावरून अवजड व प्रवासी वाहतूक सतत सुरू असते. वाहनचालकांना मोरीवर खचलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताची शक्‍यता आहे. 


पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करायचे होते. कंत्राटदाराकडून काही त्रुटी राहिल्यास दुरुस्ती करून घेण्यात येईल. रस्तादेखभाल आणि दुरुस्तीचा दहा वर्षांचा ठेका कंत्राटदाराकडे आहे. 
- अजयकुमार सर्वगौड, उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग 

रस्त्यावर कुंभिवली, माडप भागात उताराला पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीचे अपघात झाले आहेत. ग्रामस्थानी पुढाकार घेत पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजविले. कंत्राटदारांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती; तसेच खचलेला मोरीवरील रस्ता पूर्ववत करावा. 
- सुनील पाटील, माडप, खालापूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com