महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

आमदार सुरेश लाड
आमदार सुरेश लाड

कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. ही रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खोपोली-कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या हाइब्रिड अन्युटी या तंत्राच्या माध्यमातून सुरू झालेले काम तत्काळ पूर्णत्वास नेणार आहे. गावांना आणि त्यांना जोडणारे साकवांचे मजबुतीकरण; तसेच खोपोली, कर्जत, माथेरान या पालिकांसह खालापूर पालिका आणि अन्य ग्रामपंचायतीमध्ये विविध सेवा-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कर्जत, खालापूर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्ते आणि आदिवासी भागातील पायवाटा मजबूत आणि डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्‍यातील प्रशासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणणार आहे. कोंढाणे धरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या धरणाचे पाणी तालुक्‍याला मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जत तालुक्‍यातील इतर पाझर तलाव आणि अन्य धरणाचे पाणी शेतीला कसे उपलब्ध होईल याकडे लक्ष देणार आहे. वन विभागाच्या धोरणांमुळे आदिवासी समाजाला शेती करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी पुढकार घेणार आहे. त्यामुळे कर्जत आणि खालापूर तालुक्‍यातील दुर्गम भागातील वाड्या प्रकाशमान करणार आहे. भयमुक्त कर्जत आणि खालापूरमधील पोलिस यंत्रणा प्रभावी करण्यासाठी पोलिसांची संख्या वाढविणार असल्याचे लाड यांनी सांगितले. 


स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्नशील 
प्रत्येक ग्रामपंचायतीला तिची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. उन्हाळ्यात दुर्गम भागात पाणीटंचाई दूर करण्यासाठी छोटे पाझर तलाव आणि विहिरीची बांधणी करणार आहे. खालापूर तालुक्‍यासाठी खेळाडूंना स्वतंत्र क्रीडा संकुल उभारणार असल्याचे लाड यांनी सांगितले. मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयातून अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. खालापूर तालुक्‍यातील बंद झालेल्या कंपन्यांना पुन्हा संजीवनी देऊन खालापूर तालुक्‍यातील भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. माथेरानसारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाबरोबर तालुक्‍यात लेणी आणि मोठ्या प्रमाणावर रिसॉर्ट आहेत. त्यामध्ये स्थानिकांना रोजगार कसा मिळेल आणि या भागात पर्यटन कसे वाढेल यासाठी विविध संकल्पना राबवणार असल्याचे लाड यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटन संकल्पना 
ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ठिकाणी विरंगुळा केंद्रे उभारणार आहे. कर्जत, खालापूरमध्ये विविध कलावंत पुढे येत आहेत. त्यांची कला लोकांसमोर येण्यासाठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा मानस आहे. कर्जत, खालापूर तालुक्‍यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यूपीएससी, एमपीएससी या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र आणि वाचनालयाची उभारणी करणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी पर्यटन या संकल्पनेला चालना देणार आहे. शेतपिकासाठी लागणारी खते आणि अवजारे शेतकऱ्यांना माफक दरात शेताच्या बांधावर देण्याची व्यवस्था करणार आहे. शेतकऱ्यांसाठी किंवा बेरोजगार तरुणांसाठी जोडधंदा करण्यासाठी दुग्धव्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी प्रयत्न करणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com