चिवडा-चुरमुऱ्यांचे दिवस गेले!

संग्रहित
संग्रहित

महाड : नेत्याच्या प्रचारासाठी अनवाणी पायपीट करून मते मागण्याचे दिवस आता संपले. ‘ताई-माई-अक्का, विचार करा पक्का’, अशा घोषणांचा प्रचारही मागे पडला. चिवडा-चुरमुऱ्यांपासून सुरू झालेला प्रचार आता चिकन-मटण-दारूपर्यंत आला आहे. ‘ते नेते गेले आणि ते निष्ठावंतही गेले...’, अशी खंत जुन्या काळातील निवडणुकांच्या प्रचारात सहभागी झालेले ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करतात. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास दीड दशकाने महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. स्वतंत्र महाराष्ट्रातील अनेक वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ते नव्हते, त्यामुळे वाहने नव्हती; तसेच विजेची सोयही नव्हती. अशा काळात निवडणूक प्रचार करणे अत्यंत कठीण होते. त्या काळात पैशांची उधळण नव्हती, उमेदवार आणि कार्यकर्ते दिवसभर पायपीट करून चिवडा-चुरमुरे खाऊन प्रचार करत असत. आजही अनेक जुने कार्यकर्ते या आठवणी सांगताना ‘ते दिवस गेले हो...’, अशी भावना व्यक्त करतात.

महाराष्ट्र राज्य नकाशावर आल्यानंतर महाड मतदारसंघात १९६२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यापूर्वी १९५२ आणि १९५७ मध्ये अनुक्रमे द. भा. तळेगावकर आणि नानासाहेब पुरोहित निवडून आले होते. १९६२ ते १९८५ पर्यंत महाड तालुक्‍यात सहा निवडणुका झाल्या. शंकरराव सावंत, नानासाहेब पुरोहित, चंद्रकांत देशमुख, शांताराम फिलसे या नेत्यांच्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोईसुविधांवर भर देण्यात आला होता, अशा आठवणी ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात. 
कालांतराने परिस्थिती काहीशी बदलली. एखाद्या गाडीवर भोंगा लावून प्रचार सुरू झाला. भिंती रंगवणे आणि पोस्टर चिकटवणे सुरू झाले. आता तर आमूलाग्र बदल झाला आहे. प्रचारातील पैशाचा वापर शिगेला गेला आहे. चुरमुरे-चिवड्याची जागा मटण-चिकनने घेतली आहे. प्रशासनावरही ताण वाढला आहे, या बदलाकडे जुन्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. बदललेली, हायटेक झालेली निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे, असे मात्र त्यांनी आवर्जून सांगितले.

‘कसरत करावी लागायची’
ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकांत फार कसरत करावी लागत होती. मतपेट्या डोक्‍यावर घेऊन कर्मचारी केंद्रापर्यंत चालत जात, असे निवृत्त तहसीलदार जयप्रकाश रहाळकर यांनी सांगितले. कधीकधी प्रशासनाला ग्रामीण भागातील राजकीय वादाला तोंड द्यावे लागायचे. त्यावेळी प्रशासनाला समजून घेणारे नेते व कार्यकर्ते होते. अधिकारी म्हणून काम करताना अनेकदा नेत्यांच्या रागाला सामोरे जावे लागायचे; मात्र हा राग तात्पुरता असायचा, असे ते म्हणाले.

आम्ही शांताराम फिलसे यांचे कार्यकर्ते. गावागावात आज विकास दिसतो, तो त्यांच्यामुळे. एखादी जीप आमच्याकडे असायची, त्यातून प्रचार सुरू व्हायचा. बैठकांमध्ये गावच निर्णय घ्यायचा. ग्रामस्थ प्रामाणिक असायचे. आता राजकारणामुळे संबंध दुरावले आहेत. 
- वसंत साळुंखे, शिवथर

महाड तालुक्‍याच्या ग्रामीण भागात एसटी नव्हती. उमेदवाराकडेही वाहन नसायचे. आम्ही कार्यकर्ते नेत्याच्या मागे उत्स्फूर्तपणे प्रचारासाठी जायचो. कधी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी भाकरी खायला मिळायची, तर अनेकदा चिवड्यावर वेळ निभावून न्यायचो. किये गावातील विठोबा शिंदे आणि पिंपळदरीचे सहदेव सोनावणे, नारायण पवार भाकरी घेऊन येत असत.   
- दिलीप शेडगे, महाड


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com