‘माथेरानच्‍या राणी’ची प्रतीक्षा

माथेरान : श्री राम मंदिरात ग्रामस्थांना माहिती देताना अजय सावंत.
माथेरान : श्री राम मंदिरात ग्रामस्थांना माहिती देताना अजय सावंत.

माथेरान : मिनी ट्रेन व रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसोबत सोमवारी (ता. १४) बैठक घेतली. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मिनी ट्रेन पुन्हा धावू लागण्यास चार ते सहा महिने लागतील, असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर माथेरानमध्ये झालेल्या सभेत ‘रेल रोको’ आंदोलन स्थगित करण्याचा; तसेच विधानसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला. 

मध्य रेल्वेने असुरक्षिततेच्या कारणामुळे ‘माथेरानची राणी’ अर्थात मिनी ट्रेन बंद केल्यामुळे पर्यटनावर परिणाम झाला आहे. दिवाळी पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मिनी ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी ‘रेल रोको’ आंदोलन आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजीवकुमार जैन यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. 

या संदर्भात सोमवारी मुंबईत जैन यांच्या दालनात माथेरानमधील सर्वपक्षीय नेत्यांसह बैठक झाली. माथेरान परिसराची परिस्थिती पाहता मिनी ट्रेन सुरू होण्यास आणखी चार ते सहा महिने लागतील, असे जैन यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या दिवाळीत पर्यटकांना मिनी ट्रेनमधून प्रवासाचा आनंद न घेताच परतावे लागणार आहे. या सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीची माहिती माथेरानवासीयांना दिली. 


त्यानुसार नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय सावंत, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज खेडकर, भाजपचे शहराध्यक्ष विलास पाटील, शेकापचे शहराअध्यक्ष शफिक बडाणे, आरपीआयचे शहराअध्यक्ष अनिल गायकवाड यांनी नागरिकांची सभा घेतली. या सभेत ‘रेल रोको’ आंदोलन आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

निविदा प्रक्रिया पूर्ण
मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजीवकुमार जैन यांनी सोमवारी त्यांच्या दालनात माथेरानमधील सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. मिनी ट्रेनच्या दुरुस्तीसाठी माथेरानच्या घाट विभागात क्रेन, अन्य यंत्रसामग्री व नवीन डबे नेणे अत्यंत खडतर व खर्चिक आहे. त्यासाठी अगोदर नेरळ-माथेरान घाटाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर चाचणी घेतली जाईल आणि नंतर यंत्रसामग्री नेऊन शटल सेवेसाठी वेगळी लोको शेड बांधली जाईल, असे त्यांनी सांगितले. या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ठेकेदाराला कार्यादेश ३० ऑक्‍टोबरला दिले जातील; त्यानुसार आम्ही काम सुरू करू. यासाठी सर्व माथेरानवासीयांची मदत लागेल, असेही ते म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com