पेण अर्बन बॅंक ठेवीदारांच्या प्रश्‍नांकडे नेत्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या सुमारे 758 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे जिल्ह्यासह मुंबईमधील सुमारे दोन लाख ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बॅंक संघर्ष समितीची स्थापना झाली. समितीने त्यानंतर अनेक आंदोलने केली. न्यायालयीन लढाईहीही सुरू आहे.

पेण : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना विविध मुद्द्यांवर युती-आघाडीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना जिल्ह्यातील बुडीत पेण अर्बन बॅंकेच्या मुद्द्याला महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युती व विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून पेण अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांच्या प्रश्‍नाकडे पाठ फिरवली असल्याने ठेवीदारांमध्ये नाराजी आहे.
 
पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या सुमारे 758 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे जिल्ह्यासह मुंबईमधील सुमारे दोन लाख ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बॅंक संघर्ष समितीची स्थापना झाली. समितीने त्यानंतर अनेक आंदोलने केली. न्यायालयीन लढाईहीही सुरू आहे.
 
समितीच्या म्हणण्यानुसार कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने ठेवीदारांना आश्‍वासने दिली होती. ती पूर्ण केली नाहीत. शिवसेना, भाजप सरकारनेही त्याच्याप्रमाणेच दुर्लक्ष केले आहे. बॅंकेचे सुमारे दोन लाख ठेवीदार आहेत. यामध्ये पेण, कर्जत, उरण आणि अलिबाग मतदारसंघात सर्वाधिक ठेवीदार आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत पेण अर्बन बॅंकेच्या मुद्द्याकडे युती व आघाडी या दोन्हींनी पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पेण येथे झालेल्या सभेतही त्यांनी ठेवीदारांच्या प्रश्‍नावर बोलणे टाळले आहे. दुसरीकडे आघाडीचे नेतेही या प्रश्‍नावर कोणत्याही सभेत बोलताना दिसत नसल्याने ठेवीदारांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्यातील दोन लाख ठेवीदार कोणती भूमिका घेतात याकडे उमेदवारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पेण अर्बन बॅंकेच्या दोन लाख ठेवीदारांबद्दल कोणत्याही राजकीय पक्षाला सोयरसुतक राहिले नाही, ही खेदाची बाब आहे; मात्र ज्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला बॅंकेच्या लढाईत सहकार्य केले आहे, तिथे त्या उमेदवारांना ठेवीदार सहकार्य करतील.
- नरेन जाधव, कार्याध्यक्ष, पेण अर्बन बॅंक संघर्ष समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue