माथेरानमध्ये तांदळात कुजलेली पाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

येथील शिधापत्रिकाधारक धाकू गोरे यांनी पाच माणसांच्या नावे 15 किलो तांदूळ घेतले. अबनावे यांनी पावती बनवून तांदूळ गोरे यांच्या हवाली केले.

माथेरानः येथील एका रास्त धान्य दुकानातून घेतलेल्या धान्यामध्ये स्थानिकांना कुजलेली पाल सापडली. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. 

माथेरानमध्ये तीन धान्य दुकाने आहेत. त्यातील गजानन अबनावे यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक दोनमध्ये बुधवारी व गुरुवारी या दिवशी गहू, तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ हे देणे सुरू होते. त्यामध्ये येथील शिधापत्रिकाधारक धाकू गोरे यांनी पाच माणसांच्या नावे 15 किलो तांदूळ घेतले. अबनावे यांनी पावती बनवून तांदूळ गोरे यांच्या हवाली केले. त्यांनी घरी जाऊन पाहिल्यानंतर एक मेलेली पाल सडलेल्या अवस्थेत तांदळामध्ये दिसली. त्यांनी ते तांदूळ घेऊन संध्याकाळी त्या दुकानात आणले. दुकानदार अबनावे यांनी ते पार्सल बाजूला ठेवून दुसऱ्या गोणीतील तांदूळ त्यांना दिले. ही माहिती माथेरानकरांच्या निदर्शनास आल्यानंतर अनेकांकडून तीव्र भावना व्यक्त झाल्या. याप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

धाकू गोरे यांना दिलेल्या तांदळामध्ये मेलेली पाल सापडली होती. ते तांदूळ बाजूला ठेवून दुसरे तांदूळ त्यांना दिले आहेत. 
- गजानन अबनावे, रास्त भाव दुकानमालक 

धान्य आम्ही एफसीआय कळंबोली येथून सीलबंद गोणी घेऊन त्या पूर्ण तालुक्‍यात सीलबंद अवस्थेत रास्त भाव दुकानदारांना वितरीत करतो. त्यामुळे ही मेलेली पाल तांदळाच्या गोणीत कशी गेली, याबाबत कल्पना नाही. 
- दिनेश गुजराती, धान्य वितरक अधिकारी, कर्जत तालुका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue