कर्जतमध्‍ये तीन लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्‍क

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नेरळ ः कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. 21) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्जत मतदारसंघातील 326 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 247 मतदार मतदान करणार आहेत.

नेरळ ः कर्जत विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. 21) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्जत मतदारसंघातील 326 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 247 मतदार मतदान करणार आहेत.

पावसाची संततधार सुरू असल्याने मतदान प्रक्रियेसाठी लागणारी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, आणि कंट्रोल युनिट हे सर्व साहित्य घेऊन 2 हजार 230 कर्मचारी रवाना झाले आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून सर्व मतदान केंद्रांवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना निवडणूक यंत्रणेकडून मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान क्रमांक यांची माहिती देणारी चिठ्ठी देण्यात येत आहे. 

कर्जत तालुक्‍यातील 186 गावे, खालापूर तालुक्‍यातील 92 गावे, 81 ग्रामपंचायती तसेच कर्जत, खोपोली, माथेरान या पालिका तसेच खालापूर नगरपंचायत यांचा समावेश कर्जत विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात 2 लाख 82 हजार 247 मतदार असून 63 सैनिकी मतदारदेखील आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात देशाच्या सुरक्षेत असलेल्या सर्व 63 मतदारांना ऑनलाईन मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. 

कळकराई येथील 179 मतदान केंद्रावर 100 मतदार आहेत. येथे सर्वात कमी मतदार आहेत. खोपोलीतील शीळफाटा पटेल नगर येथील 260 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 1470 मतदार असून येथे सर्वाधिक मतदार आहेत. तसेच तुंगी, कळकराई येथे वाहने थेट मतदान केंद्रापर्यंत जात नाहीत. पेठ या दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत वाहने जातात; परंतु पावसाळा असल्याने तेथे वाहने पोहचणार नाहीत; तर माथेरानमधील चार मतदान केंद्रांपर्यंतदेखील वाहने जात नाहीत, त्यामुळे दस्तुरी नाका येथे मतदान साहित्य गाडीमध्ये नेऊन पुढे स्थानिक पर्यायाचा वापर केला जाणार आहे.

सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर 
कर्जत तालुक्‍यात 206, खालापूर तालुक्‍यात 120 मतदान केंद्रे बनविण्यात आली आहेत. त्यापैकी खोपोली येथील चार मतदान केंद्रे ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होती; पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने यापुढे सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर असावीत, असे निर्देश असल्याने खोपोलीमधील विहारी येथील तीन आणि वरची खोपोली येथील एक मतदान केंद्र आता तळमजल्यावर असणार आहेत. दुर्गम भागातील ढाक येथील मतदान केंद्र पायथ्याशी वदप येथील संजय नगरमध्ये असलेल्या अंगणवाडी केंद्रात आणण्यात आले असून तेथील 183 मतदार आहेत. 

पोलिस यंत्रणा तैनात 
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन यांना सुरक्षित स्ट्रॉंग रूम असलेल्या शेळके मंगल कार्यालयात पोहचविण्यासाठी पोलिस यंत्रणा तैनात असणार आहे. त्यासाठी खास मिझोराम राज्यातून नागालॅंड पोलिसची 80 रायफलधारी बटालियन आणि एसआरपीएफची एक तुकडी तैनात केली आहे. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue