दांडीबहाद्दर मतदारांचा पावसामुळे हिरमोड 

मतदारांचा पावसामुळे हिरमोड
मतदारांचा पावसामुळे हिरमोड

अलिबाग ः आठवडा सुटी आणि मतदानाची सुटी लागून आल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील, अशी अटकळ येथील पर्यटन व्यावसायिक बांधून होते; मात्र पावसामुळे मुंबई-पुण्यातील मतदारांनी पर्यटनास येणे टाळले आहे. हे मतदार उद्या (ता. 21) मतदानासाठी जाहीर झालेल्या सुटीचा वापर मतदानाचा नागरी हक्क बजावण्यासाठी करणार आहेत. त्याच वेळेस उच्चभ्रू मतदार शनिवारपासूनच अलिबागमध्ये दाखल झाले आहेत.

मांडवा, किहीम, सासवणे या परिसरातील उच्चभ्रू बंगलेधारक मतदानाचा हक्क न बजावता येथे पर्यटनासाठी नेहमी येत असतात. शनिवारी सायंकाळपासूच या लोकांचे आपल्या कुटुंबासह मांडवा जेट्टीवरून येणे सुरू आहे. वास्तविक या उच्चभ्रू लोकांचे मतदान रायगडमध्ये नसते तरीही मिळालेल्या सुटीचा वापर मतदानासाठी न करता पर्यटनासाठी करीत असतात. मध्यमवर्गीयांमध्ये ही प्रवृत्ती वाढीस लागलेली असल्याने मुंबई-पुण्यातील नागरिकी पर्यटनासाठी येत असतात. या वेळेस आठवडा सुटी लागून आलेली असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतील, असा कयास येथील हॉटेल व्यावसायिक बाळगून होते. यातील काही जण पर्यटनासाठी अलिबाग, मुरूड, दिवेआगर येथे येत असल्याने येथील निवास व्यवस्थेची बुकिंग फूल झालेली असते; परंतु या वेळेला येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चिखल झालेला आहे.

मांडवा ते गेटवेपर्यंतच्या लॉंच फेऱ्या वगळण्यात आल्या आहेत. एसटी बसेस निवडणूक कार्यक्रमासाठी लावण्यात आल्या आहेत. प्रवासाची गैरसोय आणि खराब वातावरणामुळे अनेकांनी पर्यटनास येणे टाळले आहे. 

परतीचा पाऊस लांबत असल्याने समुद्रकिनारी व्यावसायिकांना स्टॉल सुरू करता आलेले नाहीत. हे स्टॉल्स तात्पुरत्या स्वरूपात असतात. पावसाळ्यानंतर ते नव्याने बांधावे लागतात. काशिद, वरसोली, किहीम समुद्रकिनारी स्टॉल उभारण्याची तयारी सुरू आहे. 
- संदेश मांजरेकर, 
स्टॉलधारक, किहीम समुद्रकिनारा 

या वेळेला लो बजेटच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या मध्यमवर्गीयांचे प्रमाण कमी आहे; पण अशा सुट्यांसाठी मोठ्या हॉटेल्समध्ये बऱ्यापैकी बुकिंग आधीच झालेले असते. 
व्ही. एस. घारपुरे, 
मालक श्रेयश लॉज 

अद्याप पर्यटन हंगाम बहरात आलेला नाही. निवडणुकीचा माहोल आहे. त्यातच वातावरणात कमालीचा चढउतार असल्याने लोक बाहेर पडण्यास तयार होत नसावेत. 
- गणेश माळी, 
हॉटेल मॅपल आयव्ही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com