नाक्‍यानाक्‍यावर ‘राजकीय’ फड

कोलाड येथे पेपर स्टॉलवर राजकारणाची चर्चा करताना ज्येष्ठ नागरिक.
कोलाड येथे पेपर स्टॉलवर राजकारणाची चर्चा करताना ज्येष्ठ नागरिक.

रोहा : निवडणूक प्रचार थंडावल्याने आता नाक्‍यानाक्‍यावर राजकारणावर चर्चा रंगू लागल्या आहेत. यात ज्येष्ठ नागरिक अधिक हिरीरीने सहभागी होत आहेत. जाहीर सभांतून जितकी समस्यांची चर्चा झाली नाही त्याहून अधिक चर्चा नाक्‍यानाक्‍यावर होत आहे. चहाच्या टपऱ्या व पेपर स्टॉलवर या चर्चा अधिक रंगल्या आहेत.

जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत सर्वच ग्रामीण व शहरी भागांत ही चर्चा रंगली होती. यात मागील अनेक वर्षांच्या नेत्यांच्या व आमदारांच्या कामाचा उल्लेख वारंवार येत होता. पेण, कोलाड, माणगाव, महाड या भागात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण कामाची अधिक चर्चा होत होती. कर्जत, खोपोली, भागात रस्त्यांची दुरवस्था, रिलायन्स पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण आदी विषय चर्चेत होते, असे कर्जत येथील नागरिक विलास कोळंबे यांनी सांगितले.

अलिबाग, दिघी, श्रीवर्धन, मुरूड आदी समुद्रकिनारी भागात मत्स्य दुष्काळ आणि त्याबाबत सरकारचे उदासीन धोरण याचीच चर्चा अधिक रंगल्याचे मत्स्य व्यावसायिक सिद्धेश वाडकर यांनी सांगितले. म्हसळा, तळा या पट्ट्यात मागील उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईची चर्चा व आगामी काळात त्यावर काही उपाययोजना होतील का, याबाबत अंदाज लावण्यात नागरिक व्यस्त असल्याचे तळा येथील नागरिक शोएब बागवान यांनी सांगितले. 

निवडणूक म्हणजे अशा चर्चा रंगतातच. ज्येष्ठ नागरिक अनुभवाच्या जोरावर अनेक भाकिते वर्तवतात. निकाल लागेपर्यंत या चर्चा सुरू राहतात. 
- मारुती वळंज, ज्येष्ठ नागरिक, कोलाड.

निवडणूक काळात समस्यांवर चर्चा होणे साहजिकच आहे. नागरिक मनातील खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. तरुण समाजमाध्यमांवर व्यक्त होतात, तर ज्येष्ठ नागरिक नाक्‍यावर चर्चा करून भावनांना वाट करून देतात.
- महेंद्र मोगरे, कर्जत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com