नागोठण्यात महामार्गावर कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

रायगडमधील श्रीवर्धन, महाड या मतदारसंघांसह कोकणातील अनेक मतदारसंघांत तुल्यबळ लढती होणार आहेत. या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणातील जनता ही नोकरी-व्यवसायानिमित्ताने मुंबई व ठाण्यात वास्तव्य करीत आहेत. रायगड व कोकणात होणाऱ्या लढती या अटीतटीच्या होणार असल्याने एकेका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नागोठणे : निवडणूक मतदानासाठी कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या मतदारांची वाहने तसेच खासगी बसमुळे नागोठणे येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. आज पहाटेपासूनच महामार्गावर नागोठणे हद्दीत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. कोंडीत अडकल्याने बऱ्याच मतदारांचा खोळंबा झाला.
 
रायगडमधील श्रीवर्धन, महाड या मतदारसंघांसह कोकणातील अनेक मतदारसंघांत तुल्यबळ लढती होणार आहेत. या मतदारसंघातील मोठ्या प्रमाणातील जनता ही नोकरी-व्यवसायानिमित्ताने मुंबई व ठाण्यात वास्तव्य करीत आहेत. रायगड व कोकणात होणाऱ्या लढती या अटीतटीच्या होणार असल्याने एकेका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे उमेदवारांनी मतदारांना खासगी बसने आणायची शक्कल लढवून एकगठ्ठा मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उद्या कामावर रुजू होण्यासाठी मतदान करून लगेच ही सर्व मंडळी परतीच्या प्रवासाला निघणार असल्याने पहाटेच्या वेळेस एकदमच अनेक खासगी बसेस महामार्गावर आल्याने वाहतुकीचा वेग सकाळी मंदावला होता.

महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने वृत्तपत्राचे पार्सल घेऊन येणाऱ्या गाड्या उशिरा आल्या. त्यामुळे याचा फटका येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना बसल्याचे नागोठण्यातील वृत्तपत्र वितरक राजू जोशी यांनी सांगितले. वृत्तपत्रांचे पार्सल उशिरा आल्याने बराच वेळ मार्गावर ताटकळत राहावे लागले. वितरण व्यवस्थेचे कामही आज उशिरापर्यंत करावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue