बालेकिल्ल्यात शेकाप निष्प्रभ 

संग्रहित
संग्रहित

अलिबाग : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे अनपेक्षित निकाल लागले असून, श्रीवर्धन वगळता अन्य सहा मतदारसंघांत आघाडीच्या उमेदवारांचा फारसा प्रभाव दिसला नाही. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या घरात एकवटलेली सत्ता, उद्योगांसाठी जमिनी गेलेला आणि नाराज असलेला आगरी समाज, प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या मच्छीमारांचे प्रश्‍न, भाजप, राष्ट्रवादीची वाढलेली ताकद आणि बोथड झालेली आक्रमकता यामुळे शेकापची जिल्ह्यात पीछेहाट होत आहे. 

एकेकाळी शेकाप रायगड जिल्ह्यात पहिल्या; तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. 1972 पासून त्याची घसरण सुरू झाली. त्यानंतरही रायगडमध्ये वर्चस्व राखून होता. विधानसभा निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालात शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही. या पक्षाच्या चारही उमेदवारांचा दारुण पराभव पत्करावा लागला असून 70 वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा पराभव आहे. विद्यमान आमदार धैर्यशील पाटील आणि पंडित पाटील यांचा पराभव, हा तर मोठा धक्का आहे. 

रस्त्यातील खड्डे, दूषित पाणीपुरवठा, रोजगार, नापीक होणारी खारभूमी यांसारख्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेल्या अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे सुभाष (पंडित) पाटील यांना अलिबागच्या मतदारांनी घरी बसवले. या मतदारसंघातून 33 हजारांच्या फरकाने शेकापला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराला फारसा प्रभाव दाखवता आला नाही.

कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेश लाड यांना मतदारांनी नाकारले. युतीच्या कार्यकर्त्यांनी येथे प्रथमच एकजूट दाखविल्याने शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी 18 हजार 46 मतांच्या फरकाने विजय मिळवला. तिकिटावरून या मतदारसंघात चांगलेच वादळ झाले होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी केलेल्या समझोत्यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत विजय खेचून आणला. 

उरण मतदारसंघात युतीच्या अंतर्गत कलहाचे पडसाद रायगड जिल्ह्यातील इतर मतदारसंघातही उमटले होते. युतीच्या गृहयुद्धाचा फायदा शेकापचे विवेक पाटील यांना होईल, असे विश्‍लेषण काही जणांनी मांडले होते; परंतु तसे काही घडले नाही. महाड मतदारसंघात शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी 21 हजार 256 मतांनी दणदणीत विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. गोगावले यांनी कॉंग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला.

पेण- सुधागड- रोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांचा सुमारे 23 हजार 595 मतांनी पराभव केला.

राज्याच्या राजकारणात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन या सुरक्षित मतदारसंघाची निवड केली होती; मात्र शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठेची केली. अखेर आदिती तटकरे यांनी 39 हजार 621 मतांच्या फरकाने विजय मिळवत राजकारणात दमदार प्रवेश केला आहे. पनवेल मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी 92 हजार 370 एवढे मताधिक्‍य घेत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com