हुतात्म्यांची भूमी हजारो दिव्यांनी उजळली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

मध्यरात्री सिद्धगड येथे पोहचण्यासाठी भगत मास्तर प्रतिष्ठानचे तरुण दोन दिवस आधी सिद्धगड येथे पोहचले होते. त्यांनी तेथे जाऊन शहीद स्तंभ आणि समाधी परिसर स्वच्छ करून घेतला. त्या ठिकाणी केली जाणारी उगवलेले गवत काढून स्वच्छ केल्याने रात्रीच्या वेळी दिव्यांची रोषणाई करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध झाली. तरुणांनी रात्री 10 पासून 12 पर्यंत हजारो दिवे उजळवून सिद्धगड परिसर उजळवून टाकला.

नेरळः देश पारतंत्र्यात असताना कर्जत तालुक्‍यात क्रांतिकारक चळवळ उभी राहिली होती आणि त्यातील भाई कोतवाल, हिराजी पाटील यांना मुरबाड तालुक्‍यातील सिद्धगड येथील जंगलात हौतात्म्य प्राप्त झाले होते. ही सर्व भूमी दिवाळीच्या रात्री हजारो दिव्यांनी प्रकाशमान करण्याचे काम कर्जत येथील क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठानने केले. दरम्यान, सालाबादप्रमाणे या वर्षीही शेकडो तरुण सहभागी झाले होते.
 
दोन्ही हुतात्म्यांना ज्या जागेवर हौतात्म्य प्राप्त झाले, त्या ठिकाणी उभारण्यात आलेला शहीद स्तंभ येथे दिव्यांची रोषणाई करण्यासाठी शेकडो तरुण पोहचत असतात. स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांचे सुपुत्र भरत भगत यांनी ही परंपरा सुरू केली असून, या वर्षी मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक खाटेघरे, मुरबाड स्मारक समितीचे सदस्य महेश पवार यांच्यासह मान्यवर तसेच तरुण उपस्थित होते.
 
मध्यरात्री सिद्धगड येथे पोहचण्यासाठी भगत मास्तर प्रतिष्ठानचे तरुण दोन दिवस आधी सिद्धगड येथे पोहचले होते. त्यांनी तेथे जाऊन शहीद स्तंभ आणि समाधी परिसर स्वच्छ करून घेतला. त्या ठिकाणी केली जाणारी उगवलेले गवत काढून स्वच्छ केल्याने रात्रीच्या वेळी दिव्यांची रोषणाई करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध झाली. तरुणांनी रात्री 10 पासून 12 पर्यंत हजारो दिवे उजळवून सिद्धगड परिसर उजळवून टाकला. हा परिसर दिव्यांनी उजळवून तेथे हुतात्म्यांचे ब्रीद वाक्‍य असलेले "व्यर्थ न हो बलिदान' आणि "वंदे मातरम' ही नावे दिव्यांनी साकारली.

तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि दिव्यांची रचना करण्यासाठी विलास कोळंबे, शिवराम बदे, धनेश राणे, महेश शिंगटे, भूषण आगीवले, परेश भगत, जितू भगत, संतोष पेमारे, गणेश राणे, विनय शिंगटे, राजेश हाबळे, विकास हाबळे, जगदीश आगीवले, मनोज कोंडीलकर, विलास शिंगटे, रमेश गवळी, नितीन म्हसे, मनोज हाबळे, अनंता गवळी, मिलिंद विरले, विजय झांजे यांनी शेकडो दिवे उजळविले. भगत मास्तर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक सिद्धगड स्मारक समितीचे आघाडीवर राहून काम करणारे दीपक खाटेघरे यांनी केले. यापुढे मुरबाड तालुक्‍यातील प्रत्येक गावातून तरुण दिवाळी सण साजरा करण्यासाठी रात्री सिद्धगडावर पोहचेल, असे आश्‍वासन दिले आहे. 

इतिहास आजही जिवंत... 
कर्जत तालुक्‍यातील तरुणांनी भाई कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी चळवळ उभी केली. त्यातून 1942 मध्ये उभ्या राहिलेल्या या लढ्यातील दोन तरुणांना मुरबाड तालुक्‍यातील सिद्धगड येथे असलेल्या मुक्कामात वीरमरण प्राप्त झाले होते. तो इतिहास मुरबाड स्मारक समितीने जिवंत ठेवला असून, कर्जत येथील क्रांतिकारक भगत मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी सण साजरा केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue