पोलिसांनी लुटला दिवाळीचा आनंद! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

सणांच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कडेकोट बंदोबस्त देत असतात. त्यांना कोणताही सण साजरा करताना फार मोठी अडचण निर्माण होते. सतत कामाच्या व्यापातून सुटकेचा निःश्‍वास घेणे पोलिसांना शक्‍य होत नाही.

अलिबागः पोलिस प्रशासनातील कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद लुटता यावा यासाठी येथील पोलिस ठाण्यात एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नेहमी गणवेशात वावरणाऱ्या पोलिसांनी पारंपरिक कपड्यांत फराळाचा आनंद लुटला. अशाप्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच अलिबाग पोलिस ठाण्यात राबविल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
 
थर्टी फर्स्ट, मे महिन्याची सुट्टी, दसरा, नवरात्रोत्सव अशा वेगवेगळ्या सणांसह वेगवेगळ्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस कडेकोट बंदोबस्त देत असतात. त्यांना कोणताही सण साजरा करताना फार मोठी अडचण निर्माण होते. सतत कामाच्या व्यापातून सुटकेचा निःश्‍वास घेणे पोलिसांना शक्‍य होत नाही.
 
विधानसभा निवडणुकीत बंदोबस्ताच्या कामातून सुटका झाल्यावर पोलिसांना आता दिवाळीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज राहण्याची वेळ आली आहे. त्यात नागरिक सुट्टीमध्ये घरे बंद करून गावी गेले आहेत. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी आणखीनच वाढली. या कालावधीत प्रशासकीय कामकाजासह कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच घरफोडी, चोरीवर नियंत्रण ठेवण्याचे काम वाढले आहे. सतत तणावात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात मोकळीक मिळावी यासाठी अलिबाग पोलिस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांनी दिवाळीचा आनंद रविवारी लुटला. पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. डी. कोल्हे यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमामध्ये सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. नेहमी गणवेशात असलेल्या या पोलिसांनी पारंपरिक वेशभूषा करून मनमुराद फराळाचा आनंद घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue