भातकापणी मजुरांच्या कचाट्यात 

 भातकापणी
भातकापणी

खोपोलीः परतीच्या पावसामुळे एका बाजूला बळीराजासाठी संकट निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे शेतातील पाण्यात तयार भाताची नासाडी टाळण्यासाठी शेतकरी भातकापणी करण्यात व्यस्त झाला आहे; मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे व कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने भातकापणीसह अन्य शेतीची कामे होण्यासाठी मजुरांची मनधरणी करावी लागत आहे. पाऊस आणि मजुरांची वानवा अशा स्थितीत भातकापणींस सुरुवात झाल्याचे तालुक्‍याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
 
दिवसभर कडक ऊन व संध्याकाळी पाऊस अशी स्थिती कायम आहे. वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने भाताच्या लोंब्यांपासून भाताचे दाणे अलग होत आहेत. या वर्षी भातपीक उत्तम आले; मात्र पावसामुळे नुकसान होत आहे. पारंपरिक कामे करणाऱ्या स्थानिक मजुरांवर भातपिकाची कापणी प्रामुख्याने अवलंबून असते; परंतु स्थानिक शेतमजुरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या तसेच दुर्गम व आदिवासी भागातूनही मजूर पुरेशा संख्येने तालुक्‍यात येत नसल्याने शेतमजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दुर्गम भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी परतीच्या प्रवासाला लागत असल्याने आता जे उपलब्ध होतील त्यांची मनधरणी करून लवकरात लवकर भातकापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत.

दिवसा कडक उन्हामुळे शेतमजूर हैराण होत असल्याने ते भातकापणीला येण्याकडे पाठ फिरवित आहेत. त्यातच भातामधील तांदळाचा दाणा टणक बनून दाणा तुटण्याची शक्‍यता अधिक असल्याने ठराविक वेळेत भातकापणी झाली नाही तर शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. अशा स्थितीत भातकापणीची कामे घाईगडबडीत उरकण्यात येत आहेत. काही ठिकाणी भात झोडणीला प्रारंभ झाला आहे. काही भागात मजुरांची उपलब्धता नसल्याने घरच्या घरी भातकापणीसमवेत भातझोडपणी सुरू झाली आहे. यामुळे रणरणत्या उन्हाची पर्वा न करता शेतात तयार झालेले धान्य घरी आणण्याची लगबग सुरू आहे. सध्या मंजुरीचे दर 400 ते 500 रुपये रोज किंवा दोन वेळच्या जेवणासह नाश्‍ता व 400 असे आहेत. 

भातपीक तयार आहे; मात्र शेतात पाणी असल्याने अडचण येत आहे. पावसाची भीती कायम आहे. दुसरीकडे रोख मजुरी देऊनही भातकापणीसाठी मजूर मिळत नसल्याने घरातील सर्व सदस्यांना या कामी जुंपवावे लागणार आहे. 
- निवृत्ती दिसले, शेतकरी, केळवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com