खोपोली-पेण राज्यमार्ग जीवावर

खड्डे
खड्डे

खालापूर ः खोपोली-पेण राज्यमार्गाचे रखडलेले काम आणि खड्डे यामुळे प्रवास जीवावर उठला आहे. निवडणुकीचा ज्वर अद्याप न उतरल्यामुळे प्रवाशांच्या त्रासाकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. या सर्व परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालक गैरसोईंचा सामना करत प्रवास करत आहेत. खड्डे चुकविताना वाहनचालकांना अपघाताचे सत्रही सुरूच आहे.
 
औद्योगिक तालुका खालापूर आणि गणेशमूर्तीचे माहेरघर असलेल्या पेण तालुक्‍याला जोडणारा 30 किलोमीटरचा महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला हा रस्ता खालापूर हद्दीत 17 किलोमीटर, तर उर्वरित 13 किलोमीटर पेण हद्दीत येतो. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. पेण हद्दीत रुंदीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या वर्षी खालापूर हद्दीतील 17 किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झाली होती. माजी आमदार सुरेश लाड यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते; परंतु या पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर सातत्याने अवजड वाहतूक सुरू असून, बेदरकार ट्रेलरमुळे अपघाताची टांगती तलवार आहे. डोणवतनजीक तीव्र उतारावर रस्त्याची बाजूपट्टी दोन फूट खचली आहे. रस्त्यालाही मधोमध 15 ते 20 फूट लांब खड्डा पडला आहे. या ठिकाणी वाहनचालक गोंधळत असून, दुचाकीचे सातत्याने अपघात होत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम घेतलेला ठेकेदारही काम सुरू असल्याचे फलक लावून गायब आहे. त्यामुळे कामाला मुहूर्त मिळेल तेव्हा मिळेल; पण खड्डे बुजवा, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

मार्गावर पोलाद उत्पादनात अग्रगण्य असलेला उत्तम स्टील कारखाना असून, इतर 10 ते 12 नामांकित कारखाने आहेत. अवजड वाहतूक हा कळीचा मुद्दा या रस्त्यालाही लागू पडत आहे. खड्ड्याच्या जोडीला धुळीचे लोट यामुळे प्रवास नकोसा वाटतो. 
- अंकुश मोरे, वावोशी-खालापूर 

चार महिन्यांपूर्वी पेण-खोपोली राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराकडे हस्तांतरित केला आहे. रस्ता दुरुस्तीचीही जबाबदारी ठेकेदाराची आहे. 
- दामोदर पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पेण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com