उल्हास नदी बनली "कचराभूमी' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नदीवर अनेक गावांच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. हे पाणी प्यायल्याने अनेकांच्या अंगावर पुरळ उठून खाज सुटली आहे. गावात त्वचारोगाचे प्रमाण वाढल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

कर्जत ः उल्हास नदी ही कर्जत तालुक्‍याला लाभलेले निसर्गाचे वरदान आहे. बारमाही वाहणारे नितळ पाणी, कर्जत तालुक्‍याच्या निसर्गसंपन्नतेत भर घालणारी. अनेक ग्रामपंचायतींची तहान या उल्हास नदीने भागत आहे; परंतु आता वाढते नागरीकरण नदीच्या मुळावरच उठले असल्याचे चित्र दिसून येते. अनेक ग्रामपंचायती आपल्या हद्दीतील कचरा आणि सांडपाणी या नदीत सोडत आहेत.

ग्रामपंचायतींकडून उल्हास नदीमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. अनेक गावांच्या पाणी योजना या नदीच्या स्रोतांवर अवलंबून आहेत; मात्र वाढते नागरीकरण आणि जमिनीच्या हव्यासापोटी भर टाकून नदीचा गळा घोटण्याचे काम ठिकठिकाणी सुरू असताना आता ग्रामपंचायत क्षेत्रामध्येही लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. यातून निर्माण होणारा कचरा घंटागाड्यांतून गोळा करून तो थेट नदीपात्रात टाकण्यात येतो. इतकेच नाही तर मेलेली जनावरेही नदीत टाकण्यात येतात. नदीलगतच्या गावांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे.

नदीवर अनेक गावांच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. हे पाणी प्यायल्याने अनेकांच्या अंगावर पुरळ उठून खाज सुटली आहे. गावात त्वचारोगाचे प्रमाण वाढल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेते. केंद्रीय स्तरावर नदी स्वच्छतेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करते. असे असताना कर्जत तालुक्‍यात नदी प्रदूषणात वाढ होतेय हे विदारक वास्तव आहे. 

गावात जमा झालेला कचरा नदीच्या किनाऱ्यावर टाकला जातोय. कालांतराने हा कचरा वाढल्यानंतर तो नदीमध्ये मिश्रित होणार आहे. त्यानंतर नदी प्रदूषित होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने जमा केलेला कचरा नदीकिनारी न टाकता कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करावी. 
- ज्ञानेश्‍वर भगत, सामाजिक कार्यकर्ते 

नदीकिनारी टाकलेल्या कचऱ्यामुळे दामत गावात दुर्गंधी पसरू लागली आहे. या दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांवर आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. 
- अबीद खोत, ग्रामस्थ, दामत गाव 

आम्ही जेथे कचरा टाकत होतो ते ठिकाण नदीपासून 20-25 फुटांवर आहे. अन्य लोकही तेथे रात्री कचरा आणून टाकतात. पावसाळा असल्याने थोडी समस्या आहे. आता आम्ही हा कचरा उचलून ती जागा स्वच्छ करत आहोत. 
- दामा निरगुडा, सरपंच, ममदापूर ग्रामपंचायत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue